
नवी दिल्ली : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने २६ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. यासोबतच परिसरात दोन आठवडे कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नये, असे देखील सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्थापनावर (Gyanvapi Masjid Case) देखरेख करणाऱ्या अंजुमन समितीने (Anjuman Committee) सर्व्हेविरोधात याचिका दाखल केली होती. काशी विश्वनाथ मंदिराशेजारील मशीद परिसराचे सर्वेक्षण करण्याच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.
आज सोमवारी सकाळी (२४ जुलै) वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार एएसआयचे पथक सर्वेक्षणासाठी मशिदीच्या परिसरात पोहोचले होते. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सर्वेक्षण पथकाला सकाळी सव्वा अकरा वाजता कोर्टात हजर राहून सर्वेक्षणाची माहिती देण्यास सांगितली होती. याच दरम्यान, सुप्रीम कोर्टाने ज्ञानवापी मशिदीतील सर्व्हेला २६ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे.
शुक्रवारी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले असून, आम्हाला अपील करण्याची संधी मिळाली नाही आणि त्याआधीच सर्वेक्षण सुरू झाल्याचे अंजुमन समितीकडून सांगण्यात आले. खोदकामासंदर्भातील आदेश असल्यास आम्हाला दाद मागण्याची संधी मिळावी, असे अहमदी म्हणाले होते.
सर्वेक्षणादरम्यान खोदकाम होणार आहे का? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला असता, यूपी सरकारचे वकील तुषार मेहता यांनी सांगितले की सर्वेक्षण हे आधुनिक तंत्रज्ञानाने केले जाईल. यामध्ये कोणतेही नुकसान होणार नाही. हिंदू पक्षातर्फे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनीही सर्वेक्षणात कोणतेही खोदकाम होणार नसल्याचे सांगितले होते.
उत्तर प्रदेश सरकारचे वकील तुषार मेहता यांनी मशिद परिसरातील एकही वीट हलवण्यात आली नसल्याचे सांगितले. आठवडाभर सर्वेक्षणादरम्यान कोणतीही हानी होणार नसल्याचे वकील मेहता म्हणाले होते. मात्र तरीही अहमदी यांनी सर्वेक्षण थांबवण्याची आग्रही मागणी केली आणि सर्वेक्षण दोन दिवस थांबवण्यात आले.