
यमुना नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली
नवी दिल्ली : यमुना नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडल्याने दिल्लीत पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता यमुना नदीची पाणीपातळी २०६.५६ मीटरवर पोहोचली.
जुन्या रेल्वे पुलाजवळ यमुनेच्या पाण्याची पातळी १५ तासांत सुमारे एक मीटरने वाढली आहे. १३ जुलै रोजी यमुनेच्या पाण्याची पातळी विक्रमी उंचीवर (२०८.६६ मीटर) पोहोचली होती. त्यामुळे यमुनेच्या पुराचे पाणी लाल किल्ला, राजघाट आणि दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते.
दरम्यान, हरियाणात हथिनी कुंडातून पाणी सोडल्यानंतर पाण्याची पातळी वाढली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एलजी व्ही के सक्सेना यांच्याशी चर्चा केली. परिस्थितीला सामोरे जाण्याच्या तयारीबाबत दोघांमध्ये चर्चा झाली.
शाह म्हणाले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम गरजू लोकांच्या मदतीसाठी उपस्थित आहेत. तसेच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.