
सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांच्या प्रश्नाला दिले उत्तर
रत्नागिरी : रत्नागिरीतील (Ratnagari) बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्पावरुन वाद चालू आहेत, या प्रकल्पाविरोधात आंदोलनही सुरू आहे. दरम्यान, या रिफायनरीमुळे प्रकल्पासाठी प्रस्तावित जागेवर असलेल्या कातळशिल्पांना धोका निर्माण होणार आहे, असा दावा स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. हाच प्रश्न आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave), विलास पोतनीस (Vilas Potnis) आणि मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी उपस्थित केला होता. त्याला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी लेखी उत्तर दिले आहे.
संबंधित प्रश्नोत्तरात सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, 'रत्नागिरी जिल्ह्यातील ७, सिंधुदुर्गातील १ आणि गोव्यातील ९ ठिकाणची कातळशिल्पे यूनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये बारसूच्या ३ कातळशिल्पांचाही समावेश आहे. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाने बारसू येथील गावात केलेल्या आतापर्यंतच्या सर्वेक्षणात ६२ कातळशिल्पांची बारसूच्या सड्यावर नोंद केलेली आहे. त्यामुळे या कातळशिल्पाच्या संवर्धनासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनातून बारसू येथील कातळशिल्पे असलेली जमीन वगळण्यात येणार आहे”, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. म्हणजेच बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीच्या ठिकाणी ६२ कातळशिल्पांची नोंद असून, त्यांना वगळून रिफायनरी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बारसू गावातील कातळशिल्पासह एकूण आठ ठिकाणची कातळशिल्पे ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे कातळशिल्पांच्या जतन आणि संवर्धनाची आशा निर्माण झाली. मात्र बारसूमुळे त्यांना धोका निर्माण होईल, अशी चिन्हे दिसत होती. यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी कातळशिल्पांच्या जतनाविषयी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच या कातळशिल्पांसह रत्नागिरीतील १७ ठिकाणच्या कातळशिल्पांचे जतन संवर्धन करण्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.