
प्रियकरासाठी सातसमुंदर पार केलेल्या अंजूने व्हिडिओ शेअर करत केला धक्कादायक खुलासा
लाहौर : समाजमाध्यमांतून होणार्या सीमेपलाकडच्या प्रेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सीमा हैदरचं (Seema Haider) प्रकरण गाजत असतानाच आज राजस्थानमधील अंजू (Anju from Rajsthan) ही महिला आपल्या कुटुंबियांना व नवर्याला काहीच न सांगता आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी थेट पाकिस्तानात (Pakistan) पोहोचल्याची बातमी उघडकीस आली होती. यानंतर आता अंजू २१ ऑगस्टला भारतात परत येणार असल्याचे समजत आहे. याबाबत अंजूने स्वतः पाकिस्तानातून व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.
अंजूने शेअर केलेल्या व्हिडीओत तिने म्हटले आहे की, 'मी वैध व्हिसा घेऊन पाकिस्तानात आले आहे. मी येथे सुरक्षित आहे, मला कोणतीही अडचण नाही. मी काही दिवसांत परत येईन. मी मीडियाला आवाहन करते की माझ्या मुलाला आणि कुटुंबाला त्रास देऊ नका'. तिच्या या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना विराम लागला आहे. अंजू आणि तिचा पती अरविंद यांना १५ वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे.
पाकिस्तानमधील अप्पर संचालक जिल्हा पोलिस अधिकारी मुश्ताक खान यांनी सांगितले की, अंजू ही भारतीय महिला तिच्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानातील एका गावात गेली होती आणि तिच्याकडे एक महिन्याचा व्हिसा आहे. ती २१ ऑगस्ट रोजी तिच्या देशात परतणार आहे. अंजू प्रेमाखातर भारतातून पाकिस्तानात आली होती आणि तिच्या नवीन घरात ती आनंदाने राहत आहे. पुढे ते म्हणाले, स्थानिक लोक अंजूला भेटवस्तू देत आहेत, ती येथे आनंदी आहे. तसेच अंजूला सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
अंजूशी लग्न करण्याचा कोणताही विचार नाही: पाकिस्तानी मित्र
दरम्यान, नसरुल्लाह खैबरने (Nasrullah Khaibar) पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेला फोनवरून सांगितले की, अंजूसोबत लग्न करण्याचा त्याचा कोणताही विचार नाही. अंजू माझ्या कुटुंबातील इतर महिला सदस्यांसह त्याच्या घराच्या एका वेगळ्या खोलीत राहत आहे. अंजू पाकिस्तानला फक्त भेट देण्यासाठी आली असून आमचा लग्नाचा कोणताही विचार नाही, असे नसरुल्लाने स्पष्ट केले.
नेमकं प्रकरण काय?
मूळच्या मध्य प्रदेशातील असलेल्या अंजूचा विवाह २००७ मध्ये उत्तर प्रदेशमधील अरविंदसोबत झाला. ती पतीसोबत राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात राहते. काही दिवसांपूर्वी तिची फेसबुकवर नसरुल्लाह खैबर या लाहौरमधील पाकिस्तानी तरुणाशी ओळख झाली. त्यांचे बोलणे वाढत गेले आणि त्याचे घट्ट मैत्रीत रुपांतर झाले. प्रियकराला भेटण्यासाठी अंजू पती आणि मुलांना सोडून पाकिस्तानात गेली. घरी जयपूरला सहलीला जात असल्याचं सांगून अंजू पाकिस्तानात पोहोचली. अंजूच्या पासपोर्टवरील नोंदीवरून, ती २१ जुलैला व्हिजिट व्हिसावर पाकिस्तानला पोहोचल्याचे समजत आहे. दुसरीकडे तिच्या नवर्याला मात्र याबाबत काहीच माहित नव्हतं, पण दोन-चार दिवसांत ती परत येईल, शिवाय माझे तिच्यासोबत व्हॉट्सअप कॉलवर बोलणे होते, असे त्याने सांगितले होते. एकीकडे भारत-पाकिस्तानमध्ये सातत्याने तणावाची स्थिती निर्माण होत असताना या दोन देशांतील प्रेमप्रकरणं ही चर्चेचा विषय ठरत आहेत.