
गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून माहिती आली समोर
मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून रोजगारासह इतर निमित्ताने बांगलादेशी घुसखोर मोठ्या संख्येने मुंबई - पुण्यात स्थायिक होत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत १५ हजार आणि पुण्यात मागील काही काळात तब्बल ५ हजार बांगलादेशी कुटुंबासमवेत स्थायिक झाले आहेत. परंतु सध्या पोलिसांकडून बांगलादेशींवर कारवाई होताना दिसत नाही किंवा नगण्य कारवाई होत असल्याने त्या घुसखोरांचे फावल्याचे दिसत आहे.
देशात वेगवेगळ्या कारणांवरून धार्मिक तेढ निर्माण होण्याचे प्रमाण वाढत असतानाच आता घुसखोरीवरून सामाजिक ताणतणाव आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बांगलादेशी सीमारेषा ओलांडून भारतात आल्यानंतर ते लोक दागिने कारागीर, बांधकाम मजुरी, हॉटेल वेटर, चिकन सेंटर, फेरीवाले आदीनिमित्त वेगवेगळ्या भागात स्थायिक होत आहेत. अशाच प्रकारे गेल्या १०-१२ वर्षात मुंबईतील बांद्रा येथील बेहरामपाडा, अंधेरीमधील बेहरामपाडा, धारावी, जोगेश्वरी, कांदिवली, बोरीवलीसह मुंबई उपनगरात सुमारे १५ हजाराहून अधिक बांगलादेशी घुसखोरांनी आपले बस्तान बसवले आहे. ठाण्यातील मुंब्रा, मीरारोड, भायंदर, नालासोपारा भागातही बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तर मागील सात ते आठ वर्षांत पुण्यातील हडपसर परिसरातील ससाणेनगर, चाकण ओद्योगिक क्षेत्र, वाघोली, कॅम्प, लोणीकाळभोर आदी परिसरात बांगलादेशी घुसखोरांनी आपले बस्तान बसवले आहे. कामानिमित्त भाड्याने खोली घेऊन राहिल्यानंतर स्थानिकांना ते आपण पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचे सांगून स्थानिक अधिका-यांना चिरीमिरी देऊन आधार कार्ड, पॅन कार्ड, शिधापत्रिका व इतर शासकीय कागदपत्रे तयार करत आहेत. संबंधित कागदपत्रे बनवण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींची देखिल मदत होत असल्याने ते या तपास यंत्रणेच्या रडारवर आले आहेत. परंतू पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत राबवण्यात यावी, असे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. बांगलादेशी व्यक्ती शोधणे, त्यांची कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांचे साथीदार शोधणे तसेच त्यांची पाठवण करणे आदी कामे वेळखाऊ असल्याने पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.
सहा महिन्यापूर्वी भाजपने बांगलादेशी, रोहिंग्या विरोधात मुंबईत काढला होता मोर्चा
घुसखोर बांगलादेशी रोहिंग्याना हटवा, दादर वाचवा, अशी मागणी करत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात जानेवारीत दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजपने घुसखोर बांग्लादेशी नागरिकांविरोधात जोरदार आंदोलन केले होते.