Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai Crime news : कलिनामध्ये धावत्या रिक्षात महिलेवर चाकूने वार; तर मुंबईत...

Mumbai Crime news : कलिनामध्ये धावत्या रिक्षात महिलेवर चाकूने वार; तर मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग

महिलांची सुरक्षितता आहे कुठे ?

मुंबई : राज्यभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जोर धरत असतानाच मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणीदेखील आता दिवसाढवळ्या महिलांसोबत गैरवर्तणुकीचे प्रकार घडत आहेत. आजच्या दिवसात केवळ मुंबईतून धक्कादायक दोन घटना समोर आल्या आहेत. सांताक्रुझमधील कलिना येथे एका पतीने घटस्फोटाच्या आठ दिवसांनंतर रिक्षात बसलेल्या पत्नीवर धावत्या रिक्षात चाकूने वार केला, तर पश्चिम रेल्वेवरील ग्रँडरोड स्थानकावर धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनांमुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

कलिना येथे घडलेल्या संतापजनक घटनेत घटस्फोटाच्या आठ दिवसांनंतर पतीने पत्नीवर धावत्या रिक्षात चाकूने वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २० जून रोजी दोघांमध्ये घटस्फोट झाला आणि बुधवारी २८ जूनला ही घटना घडली. पत्नी सीएसटी रस्त्यावरुन कामाला जात असताना पतीने तिच्यासाठी रिक्षा थांबवली आणि चर्चा करण्यासाठी जबरदस्ती तिला रिक्षात बसवले. रिक्षात बसल्यावर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि यात पतीने तिच्यावर चाकूने वार केले. तिने आरडाओरडा करत स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तेव्हा रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली. त्यानंतर रिक्षामधून उडी मारत पत्नी थेट हॉस्पिटलकडे रवाना झाली. आरोपी पती फरार असून त्याच्याविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथके तयार करुन त्याचा शोध घेत आहेत.

पुन्हा एकदा धावत्या लोकलमध्ये तरुणीसोबत गैरवर्तन

पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local) एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती. ग्रॅन्ट रोड स्थानक येताच एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. अश्लील चाळे, अश्लील वक्तव्य करीत तो तरुणीला त्रास देत होता. संबंधित तरुणीने आरडाओरडा केला असता त्या तरुणाने लोकलचा वेग कमी होताच उडी मारून पळ काढला. याप्रकरणी बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केली. या तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्रान्च आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. पोलीस स्थानकात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजदेखील तपासण्यात येत आहेत.

महिलांची सुरक्षितता आहे कुठे ?

गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दर्शना पवार हत्या प्रकरण (Darshana Pawar), एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने केलेला वार, पुण्यातील कोयता गँगची (Koyta gang) दहशत यामुळे संपूर्ण पुणे हादरलं आहे. तर मुंबईतही लोकलमध्ये महिलांवर होणा-या अत्याचाराची ही काही पहिली घटना नाही. शिवाय इतर ठिकाणी देखील कधी चारित्र्याच्या संशयावरुन तर कधी मूल होत नाही म्हणून महिलेचा क्रूरपणे जीव घेतला जातो. समाजात वाढत चाललेली हा विकृती चिंताजनक आहे आणि प्रशासनाने यावर ठोस पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -