
मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल (Sanjeev Jaiswal) यांना ईडीने (ED) समन्स बजावले आहे. काही दिवसांपूर्वी ईडीकडून मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी छापेमारी (ED Raid) करण्यात आली होती. त्यावेळी संजील जैस्वाल यांच्याही घरी छापेमारी करण्यात आली होती. आता समन्स बजावल्याने आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जैस्वाल यांच्या घरी छापेमारीत ईडी अधिकाऱ्यांना रोख रक्कम आणि मालमत्ता सापडल्या आहेत. यापैकी बहुतेक मालमत्ता या संजीव जैस्वाल आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित आहे. जैस्वाल यांच्या पत्नीकडे मढ आयलँड अर्धा एकर भूखंड आणि ३४ कोटी रुपयांचे अनेक फ्लॅट्स अशा सुमारे २४ मालमत्ता आहेत आणि १५ कोटींच्या एफडी आहेत. एका आयएस अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती आली कुठून? याचासुद्धा तपास ईडीकडून केला जाणार आहे.
कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने त्यांना गुरुवारी सुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र काही महत्त्वाच्या कामांत असल्यामुळे संजीव जैस्वाल चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे आता ईडीने त्यांना पुन्हा एकदा समन्स धाडले आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस हॉस्पिटलच्या टेंडर बोलीच्या वेळी संजीव जैस्वाल अतिरिक्त महापालिका आयुक्त होते आणि महत्त्वाचे म्हणजे स्थापन करण्यात आलेल्या समितीचा भाग होते. ज्यांनी लाईफलाईन हॉस्पिटलला मॅनेजमेन्ट सर्व्हिसेस कंपनीला टेंडर दिले.
टेंडर प्रक्रियेवेळी ज्या कंपनीला हे कंत्राट द्यायचे आहे, त्या कंपनीकडे पूर्वीचा अनुभव आणि पात्रता याचा विचार करून एक कंत्राट देणे आवश्यत होते. मात्र तपासात या कंपनीला पुरेसा अनुभव नसताना शिवाय या कंपनीकडे रुग्णसेवेसाठी पुरेशी मनुष्यबळ आणि साहित्य उपलब्ध नसतानासुद्धा या कंपनीला कंत्राट देण्यात आले. या कंपनीला संजीव जैस्वाल यांनी कंत्राट का दिले? याची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे.