Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Australia Vs England: ऑसींच्या गोलंदाजीपुढे इंग्लडची घसरगुंडी

Australia Vs England: ऑसींच्या गोलंदाजीपुढे इंग्लडची घसरगुंडी

लॉर्ड्स (वृत्तसंस्था) : ॲशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा तिसरा दिवस ऑस्ट्रेलियाच्या (Australia) गोलंदाजांनी गाजवला. मिचेल स्टार्कने इंग्लंडच्या (England) तीन फलंदाजांना माघारी धाडले. तर अन्य गोलंदाजांनीही दमदार गोलंदाजी करत इंग्लंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. इंग्लंडचा डाव ३२५ धावांवर सर्वबाद झाला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाने बिनबाद ४७ धावा केल्या होत्या.

तिसऱ्या दिवशी २७८ धावांवर ४ फलंदाज बाद असे खेळायला आलेल्या इंग्लंडच्या संघाला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी एकामागोमाग एक धक्के दिले. त्यामुळे यजमानांचा डाव अवघ्या ३२५ धावांवर आटोपला. इंग्लंड पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारेल अशी अपेक्षा होती. परंतु कांगारूंच्या गोलंदाजांनी त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले. मिचेल स्टार्कने संघातर्फे सर्वाधिक ३ विकेट मिळवले. हेझलवूड आणि हेड यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी धाडले. कमिन्स, लायन आणि ग्रीन यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला होता. त्यांनी २० षटकांत नाबाद ४७ धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजा ३१, तर डेविड वॉर्नर १५ धावांवर खेळत आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. परंतु तिसरा दिवसाची सुरुवात त्यांच्यासाठी खराब झाली.

Comments
Add Comment