
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आता कैलास मानसरोवर दर्शनासाठी चीनमधून जाण्याची गरज भासणार नाही. उत्तराखंडमधील लिपुलेखच्या डोंगरावरून भाविकांना कैलास मानसरोवर पाहता येणार आहे. २०१९ मध्ये शेवटच्या वेळी लोकांनी दर्शनासाठी प्रवास केला होता. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने कैलास मानसरोवर यात्रा पुढे ढकलली जात होती.
नुकतीच यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी आणि नवीन मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञांचे पथक जुने लिपुलेख येथे पोहोचले होते. तेथील रोड मॅप, लोकांची राहण्याची व्यवस्था, दर्शनाच्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग आणि इतर गोष्टींवर त्यांनी संशोधन केले.लवकरच ते आपला अहवाल पर्यटन मंत्रालयाला सादर करतील. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू होईल. उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यात सुमारे १८ हजार फूट उंचीवरून कैलास पर्वत पाहणे पूर्णपणे शक्य आहे.
तिबेटमधील कैलास पर्वत नाभिधंगच्या अगदी वरच्या २ किलोमीटर उंच टेकडीवरून सहज दिसतो. असा दावा केला जात आहे की, हे आतापर्यंत कोणालाही माहीत नव्हते, परंतु जेव्हा काही स्थानिक लोक जुन्या लिपुलेखच्या टेकडीच्या शिखरावर पोहोचले तेव्हा तेथून कैलास पर्वत अगदी जवळ आणि दिव्य दिसला. याबाबत त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली.
कैलास पर्वतरांग काश्मीरपासून भूतानपर्यंत पसरलेली आहे. हा पर्वत ल्हा चू आणि झोंग चू यांच्यामध्ये आहे. येथे दोन जोडलेली शिखरे आहेत. यापैकी उत्तरेकडील शिखर कैलास म्हणून ओळखले जाते.
या शिखराचा आकार विशाल शिवलिंगासारखा आहे.हिंदू धर्मात त्याच्या प्रदक्षिणाला खूप महत्त्व आहे. परिक्रमा ५२ किमी आहे. १९६२ मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तेव्हा चीनने भारताचे कैलास आणि मानसरोवर ताब्यात घेतले. आता इथे जाण्यासाठी चिनी टूरिस्ट व्हिसा घ्यावा लागेल. यामुळे कैलासला जाणे सोपे नाही.