अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान सामना (India vs Pak) म्हणजे दोन्ही देशांच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते. भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (World cup 2023) भारत-पाक सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याकरिता आतापासूनच हॉटेल बुकींगला सुरुवात झाली आहे. तसेच हॉटेलचे दर सध्यापेक्षा तब्बल दहा पटीने वाढल्याचे समजते.
वेगवेगळ्या संकेतस्थळ अथवा ॲपवरून बुकिंग सुरू झाली आहे. दहापटीने रुमचे दर वाढले आहेत. काही हॉटेलच्या किमती एका दिवसासाठी एक लाख रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. काही रुम बुकही झाल्याचे समजते. भारतात होणाऱ्या विश्वचषकाला १०० दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. दोन दिवसांपूर्वी आयसीसीने विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर प्रत्येकजण सामना पाहायला जाण्यासाठी प्लॅनिंग करत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हायहोल्टेज सामन्यासाठी तर आतापासूनच बुकिंग सुरू झाली आहे.