Monday, July 1, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीGajanan Maharaj : संतकृपेची महती...

Gajanan Maharaj : संतकृपेची महती…

  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

मागील भागात आपण पाहिले की, गंगाभारती गजानन महाराजांच्या कृपेने महारोगातून कसे मुक्त झाले. श्री गजानन महाराजांनी सन १९०८ साली गंगाभारती यांना महारोगातून बरे केले. महाराजांना त्यांनी म्हटलेले भजन खूप आवडायचे. गंगाभारतीचे भजन ऐकून महाराज संतुष्ट होत असत.

महाराजांचे आवडते पद होते – ‘चंदन चावल बेल की पतिया’. ग्रंथातील अध्याय क्रमांक ३, ओवी क्रमांक ५२ व ५३ मध्ये दासगणू महाराज यांनी याचा उल्लेख केला आहे. तो असा –
कधी गवयासमान।
अन्य अन्य रागांतून।
एकाच पदांते गाऊन। दाखवावे निजलीले॥५२॥
चंदन चावल बेल की पतिया।
प्रेम भारी या पदा ठाया।
ते आनंदात येवोनिया। वरच्यावरी म्हणावे॥५३॥
या अध्यायामध्ये देखील असाच उल्लेख आला आहे –
गोसाव्याचे ऐकून भजन।
होई संतुष्ट समर्थ मन।
प्रत्येक जीवाकरण।
गायन हे आवडते॥९६॥

पुढे गंगाभारतीची पत्नी आपल्या संतोषभारती या मुलास घेऊन आपल्या पतीला घरी नेण्यासाठी आली आणि पतीला म्हणू लागली, “आता तुमची व्याधी बरी झाली आहे हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे. समर्थ हे साक्षात चंद्रमोळी आहेत हेच खरे.”

मुलगा देखील हेच बोलला, “बाबा आता गजानन महाराजांना विचारून गावी चला. येथे राहाणे पुरे झाले.”

यावर गंगाभारती बोलले, “मला हात जोडू नका. आजपासून मी तुमचा खचितच नाही. श्री गजानन स्वामी माऊली येथे बसलेले आहेत. त्यांनी चापट्या मारून माझी धुंदी उतरविली. आता संसाराचा संबंध नको.” तसेच आपल्या मुलास त्यांनी एक छान असा मातृसेवेबद्दलचा उपदेश केला. बोलले,
हे संतोषभारती कुमारा।
तू तुझ्या आईस नेई घरा।
येथे नको राहूस जरा।
सवडदजवळ करावे॥१०५॥
हिचे जीवमान जोवरी।
तोवरी हीची सेवा करी।
ही तुझी माय खरी।
हिला अंतर देऊ नको॥१०६॥
मातोश्रींचे करिता सेवा।
तो प्रिय होतो वासुदेवा।
पुंडलिकाचा ठेवावा।
इतिहास तो डोळ्यांपुढे॥१०७॥
मी येता सावडदात।
पुन्हा रोग होईल पूर्ववत।
म्हणून त्या आग्रहात।
तुम्ही न पडावे दोघांनी॥१०८॥
आजवरी तुमचा होतो।
आता देवाकडे जातो।
नर जन्माचा करून घेतो।
काही तरी उपयोग ॥१०९॥
हा वाया गेला खरा।
नराचा जन्म साजिरा।
चुकेल चौऱ्यांशीचा फेरा।
ऐसे साच सांगितले॥११०॥
समर्थकृपेने निश्चिती। झाली मला ही उपरती।
या परमार्थ खिरीत माती।
टाकू नका रे मोहाची॥१११॥

संतांची कृपा काय करू शकते बघा. गंगाभारतीचा महारोग संपूर्ण बरा झाला. एवढेच नव्हे, तर त्यांची परमार्थाची गोडी वाढली. पुढे काही दिवस गंगाभारती शेगावी राहिले. त्यांनी अनेक दिवस एकतारा घेऊन समर्थांच्या आवडीची पदे पदांतरे म्हणून महाराजांची सेवा केली. पुढे श्री महाराजांच्या आज्ञेवरून ते मलकापूर येथे गेले. संतकृपेचे महिमान सांगताना शेषही थकून जातो तिथे म्या पामराने काय वदावे?

क्रमशः

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -