Tuesday, July 23, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यशेतकरी तरसला, पाऊस बरसला...!

शेतकरी तरसला, पाऊस बरसला…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

महाराष्ट्रात ज्या भागामध्ये शेतकरी पावसाची प्रतीक्षा करायचा त्या भागात पावसाने केव्हाचीच नुसती हजेरी लावली असे नव्हे तर नद्या-नाले दुथडी भरून वाहतील अशी स्थिती निर्माण केली, तर दुसरीकडे कोकणामध्ये मृग नक्षत्राच्या दिवशी पाऊस नुसती हजेरीच लावत नाही तर कोकणातील पावसाचे आगमन अगदी वेड्यासारखं, पिसाटल्यासारखं होत असतं. लोकांनी मनातल्या मनात किंवा अगदी गावगप्पा मारत असताना शिव्या घातल्या तरीही पावसाला जेवढं बरसायंच तेवढंच तो बरसतो आणि जेव्हा पाठ फिरवायची तेव्हा तो आर्जव, विनवण्या करूनही येत नाही. कोकणात मृग नक्षत्राला पाऊस नाही असं कधी झालं नाही; परंतु यावर्षी मृग नक्षत्राला पाऊस आला नाही. जसं काही एप्रिल-मे महिन्यात उन्हाळा असावा किंबहुना त्यापेक्षाही अधिक कडक असणारा उन्हाळा यावेळी जाणवला. घामाच्या धारांनी ओलेचिंब होण्याची वेळ शेतकऱ्यांवर, सर्वसामान्यपणे सर्वांवर आली. ‘यंदा मिरग सुको गेलो’ यावर मग कोकणच्या मुलखामध्ये ‘गजाली’ रंगल्या नसत्या तरच नवल; परंतु सर्व कोकणवासीयच पावसाच्या उशिराच्या आगमनाने धास्तावले होते. पाऊस कधी पडणार अशीच अस्वस्थ करणारी स्थिती समाजात निर्माण झाली होती आणि अखेर एकदाचा पाऊस आला; परंतु खरं तर तो नेहमीसारखा आलाच नाही.

पावसाची कोकणातील ‘एन्ट्री’ म्हणजे आसमंत दणाणतच त्याचं आगमन असतं. गुडगुढी म्हातारीचे आवाज नाहीत की, आसमंतातलं लाईटिंग नाही यातल काहीच न करता तो तसा निमुटपणे उशिराने हजर झाला. यामुळे साहजिकच शेतकरी थोडा फार सुखावला. सुरुवातीला शेतीच्या कामाला सुरुवात कशी करायची याच्या नियोजनाने शेतकरी हैराण होता. त्याचं कारण भात पेरणी, जमिनीची उखळ, जमिनीची दुबार नांगरणी असे कितीतरी प्रश्नांची उत्तर सापडत नव्हती. मात्र, तरीही तो आनंदी मनाने भात पेरणी करता झाला. पुन्हा पाऊस पाठ फिरवतो की काय, अशी शंका सर्वांना येत होती; परंतु जमीन भिजवण्यापुरता पाऊस येत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला भाताची पेरणी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात होत असते आणि जूनच्या सुरुवातीलाच त्या पेरणी केलेल्या भाताची लावणी केली जाते. जून महिन्यात कोकणातील शेतकऱ्याला अजिबात उसंत नसते. भात लावणी आटोपल्यावरच शेतकरी थोडाफार शेती कामातून मोकळा असतो; परंतु बदलत्या ऋतुचक्रामध्ये शेतकऱ्याचं स्वत:चं दरवर्षी केलेलं नियोजन ढासळत आहे.

शेतकरी तरीही यातूनही उभारी घेण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या काही वर्षांत हे सर्व विचित्र होत असतानाही भातशेतीचं प्रमाण कोकणात वाढत आहे. कोकणातील घरांमध्ये वयोवृद्धांची संख्या फार मोठी आहे. जे तरुण कोकणात आहेत, त्यातील बहुतांश तरुण फळ बागायती, भातशेतीत राबताना दिसतात. यामुळेच भातशेती लावणीचे प्रमाण वाढलेले दिसते. पूर्वी कोकणातील तरुणांना काम करायला नको म्हणून शिक्के मारलेले असायचे. आज हेच तरुण मोठ्या प्रमाणात शेती करतात. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनेक संस्था त्यांना मार्गदर्शन करतात. यामुळे शेती क्षेत्राला पुन्हा एकदा बरे दिवस येत आहेत. कोकणाकडे पाहण्याचे चष्मे बदलले पाहिजेत. कोकणात शेती क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना आपणच प्रोत्साहन दिलं पाहिजे. विशेषत: फळ बागायतीतही तरुण काम करत आहेत. कलिंगड लागवड करून मोठं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. फळमाशीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनियमित असणाऱ्या पावसाचा परिणाम हा जाणवतोच आहे. शेतीतील सगळ्याच गोष्टी लांबणीवर पडत आहेत. मात्र, तरीही कोकणातील शेतकरी कधी हार मानत नाही. तो प्रयत्न करीत राहातो. म्हणून परूळे गावातील प्रगतशिल शेतकरी प्रदीप प्रभू शेती क्षेत्रात आदर्श निर्माण करीत शेतीतून उत्तम उत्पन्न घेऊ शकतो.

हा वस्तुपाठच देत आहेत. पारंपरिक शेती करत असताना शेती क्षेत्रात आधुनिकता येत आहे. आपल्या शेतातही आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. तरच शेतकऱ्याला चांगलं उत्पादन आणि त्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकेल. निसर्गाचा लहरीपणा अलीकडे वाढत चालला आहे. त्याची कारणंही तशीच आहेत. मानवाकडून निसर्गावर मात करण्याचा जो अट्टहासीपणा चालला आहे त्यामुळे भविष्यात यापेक्षाही भयावह स्थिती निर्माण होईल. आपण जर वेळीच सावध झालो नाही, आपली बदललेली जीवनपद्धती बदलली नाही, तर फार मोठ्या संकटाला सामोरे जावं लागेल. त्यासाठी वेळीच सावध व्हायलाच हवे. आजच्या स्थितीने पावसाच्या उशिराच्या आगमनाने थोडं फार तरी सावरेल पण पुढचं काय प्यायलाच पाणी असेल की नाही त्याचीही कोणीही शाश्वती देता येणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -