Friday, May 9, 2025

अग्रलेखसंपादकीय

विद्येचे माहेरघर की, क्राइम कॅपिटल?

विद्येचे माहेरघर की, क्राइम कॅपिटल?

पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहरात महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या विविध भागांतील मुले शिक्षणासाठी पुण्यात येतात. अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत साधारणत: सलग चार-पाच वर्षे मुलांचा पुण्यात मुक्काम असतो. वास्तव्य महाविद्यालयातील वसतिगृहात किंवा मुले ग्रुप करून भाडेतत्त्वावर जवळपास रूम घेऊन राहतात. अभ्यास करत असतात. घरापासून लांब राहून, तसेच कुटुंबापासून दूर असताना या मुलांपुढे एकच फोकस असतो, तो म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण होणे. त्यामुळे पुण्यातील मेडिकल कॉलेज, इंजिनीअरिंग कॉलेज असो किंवा आयटी क्षेत्राच्या परिसरात १८ ते २५ वयोगटांतील मुले आपल्याला अत्यंत मोकळेपणाने फिरताना दिसतात. मात्र, गेल्या आठवड्याभरात दोन तरुणींवर प्राणघातक हल्ल्याच्या घटनेमुळे शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही हल्ल्यात परिचित व्यक्ती आरोपी असला तरी, मुलींना शिक्षणासाठी घरापासून दूर पाठवायचे की नाही असा चिंता करणारा सवाल सध्या पालकवर्गाला सतावत आहे.


आठवड्याभरातील पहिली घटना म्हणजे एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्येची. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी शिताफीने तिचा मित्र राहुल हंडोरेला ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे एकमेकांचे दूरचे नातेवाईक. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती; परंतु नात्यात असल्यामुळे पवार कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. घरच्यांनी तिचे इतरत्र लग्न ठरवले होते. दर्शना ही नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती, तर दुसरीकडे राहुल मात्र परीक्षेत अपयशी झाला होता. त्यातच लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याच्या रागातूनच राहुलने दर्शनाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे. दुसरी घटना ही पुण्यातील सदाशिव पेठेत घडली. मंगळवारी सकाळी एक थरार पाहायला मिळाला. त्याची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत चर्चा होती. एका हल्लेखोराने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केला. मात्र, प्रसंगावधान राखत दोन युवकांना या हल्लेखोराला रोखण्यास यश मिळाले. हल्लेखोर कोयता उगारून तरुणीच्या डोक्यावर प्रहार करण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात लेशपाल या तरुणाने थेट या हल्लेखोराचा हात धरला आणि कोयता हिसकावला. त्यानंतर अनेक लोक नंतर जमले आणि तरुणीचा जीव वाचवला; परंतु घटना घडताना उघड्या डोळ्यांनी पाहणारे रस्त्यावरील नागरिकांनी सुरुवातीला बघ्याची भूमिका घेतली होती. तो तरुण मध्ये पडला नसता तर... काय घडले असते, याचे चित्र आता निर्माण झाले आहे. लेशपाल या तरुणाच्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत असताना, बघ्याची भूमिका घेणाऱ्यांवर टीका होत आहे. आपली बहीण किंवा जवळची नातेवाईक असती, तर अशी बघ्याची भूमिका कोणी घेतली असती का? अशी चर्चा सजग पालक करत आहेत. लेशपालने हल्लेखोराला थेट पोलिसांच्या हवाली केल्याने पुढील अनर्थ टळला. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये आरोपी हल्लेखोरावर गुन्हा दाखल झाला. तो सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहे. प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून ही सगळी घटना घडल्याचे कारण सांगण्यात येते; परंतु या घटनांमध्ये पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या एकूण विद्यार्थिनी, त्याचे पालक यांच्या जीवाची घालमेल होत असल्याचे दिसून येत आहे. सदाशिव पेठेसारख्या गर्दीच्या ठिकाणी हा प्रसंग घडल्यावर देखील बराच वेळ पोलिसांचा पत्ता नव्हता असे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे पोलीस नक्की काय करतायत?, असा प्रश्न पुणेकर विचारत आहे.


स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे मोठ्या ध्येयाने पिछाडलेले असतात. त्यात त्यांची मेहनत, परीक्षेबरोबर आयुष्यातील महत्त्वाची वर्षे ही विशिष्ट हेतूने अभ्यासासाठी वाहून घेतात. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना अभ्यासाच्या निमित्तानेही मित्र-मैत्रिणी एकत्र येतात; परंतु कोयत्या हल्ल्याच्या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर कोणाशी मैत्री करायची आणि कोणाशी नाही, असा प्रश्न मुलींसमोर उभा राहिला आहे. पालक मंडळी घरी असली तरी त्यांचे लक्ष हे मुलांच्या काळजीत अडकलेले असते. भवितष्यात मुला-मुलींचे चांगले करिअर होईल या आशेपोटी शिक्षणाचा खर्च पालकवर्ग विनातक्रार करत असतात. मात्र, मुलींच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने पालक वर्ग धास्तावले आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता क्राईम कॅपिटल म्हणून होते की काय असे चित्र निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत पुण्यात घडलेल्या घटनांनी अक्षरशः महाराष्ट्र हादरला आहे. कायद्याचा धाक राहिला नाही तर मुलांना कोणाच्या भरवशावर शिक्षणासाठी पाठवायचे हा मोठा प्रश्न आहे. पुणे पोलिसांकडून आता कोणत्या योजना आखल्या जात आहेत. यानंतर अशा घटना रोखण्यात कितपत यश मिळते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. नाही तर पुण्यातील शिक्षण पंढरीतील कॉलेजेस भविष्यात ओस पडण्याचा धोका नाकारता येत नाही.

Comments
Add Comment