
सोलापूर: सोलापुरात (Solapur) पाकिस्तानचे राष्ट्रध्वज (Pakistan Flag) विकल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील शाही आलमगीर ईदगाह मैदानाबाहेर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज असणारे फुगे विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे मुस्लीम बांधवांनीच या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
सोलापूर शहरातील होटगी रस्त्यावर एक फुगेवाला पाकिस्तान जिंदाबाद, लव्ह पाकिस्तान असा मजकूर लिहिलेल्या फुग्यांची विक्री करत होता. ही बाब ईदच्या नमाजासाठी येणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या नजरेस पडली. त्यांनी तत्काळ ही माहिती या भागात तैनात असणाऱ्या पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी फुगे विक्रेत्याला ताब्यात घेतले. अजय पवार असे या विक्रेत्याचे नाव आहे. तो शहरातील विजापूर रोडवरील पारधी वस्ती भागात राहतो.
अजय पवार पाकिस्तानचे नाव व राष्ट्रध्वज असणारे फुगे विक्री करत असल्याची बाब लक्षात आल्यानतंर मुस्लीम बांधवांनी त्याला जाब विचारला. तसेच हे फुगे किती जणांना विक्री केले, अशी विचारणाही केली. त्यावर या अजय पवारला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे नमाजासाठी आलेल्या व्यक्तींनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.