Wednesday, April 30, 2025

श्रध्दा-संस्कृतीसाप्ताहिक

Pandharichi Wari : पंढरीची आषाढी एकादशी!

Pandharichi Wari  : पंढरीची आषाढी एकादशी!
  • आषाढी विशेष : काशिनाथ माटल

गेला महिनाभर अनवाणी पायाने दऱ्या-खोऱ्यातून चालत आलेली आषाढीवारी आज पंढरपुरात एकादशी दिनी संपन्न होत आहे. सातशे-साडेसातशे वर्षांपूर्वी किंबहुना त्याही अगोदरपासून सुरू झालेली ही पायीवारी आजही नित्यनेमाने सुरू आहे. साधारण जेष्ठ महिन्याच्या योगिनी एकादशीपासून ही पायीवारी वेग घेते. आज शैक्षणिक पातळी उच्च कोटीची झालीय आणि अत्याधुनिकताही कमालीची पराकोटीला पोहोचलीय! पण या पायीवारी परंपरेत वर्षोगणीक लाखोंच्या संख्येने भर पडत आहे! याचे नेमके किंवा अचूक कारण काय? हे कोणाही अभ्यासकाला सखोलपणे सापडले असेल, असे वाटत नाही. यावर वारकरी भक्तगण म्हणेल, ‘न उमगे आम्हास कारण, रंगे आम्ही सदा पांडुरंगे!’ हे असं बोलून आजचा वारकरी भाबड्या भक्तीने या प्रथेकडे पहात असेल; परंतु या प्रथेमागे एक सामाजिक एकता हा पैलू आहे, हे विसरून चालणार नाही.

जवळपास हजार-बाराशे मैलाचे अंतर पायी पादत्राणे न घालता, महिना पाऊण महिना... घाट प्रति घाट चढत... वारकरी पंढरी पोहोचतो. हाती टाळ, मुखे पांडुरंगाचे नाम आणि मृदंगाच्या तालावर नाचत तो आपली वारी पूर्ण करतो.

आधी अंगाची काहिली करणारा डोईवर उन्हाचा जाळ आणि मग पाठोपाठ आभाळ फाटल्यागत पाऊस...! चालून पाय भेदळलेले... उपास-तापास... अर्धपोटी वारकरी जेव्हा पंढरपुरात पोहोचतो आणि नुसत्या पांडुरंगाच्या मुखदर्शनाने समाधान पावतो! तेव्हा हे पाहून पाहणारा आचंबित होतो. या भक्तीमागे काय तत्त्व आहे? काय लॉजिक आहे? हे बाराशे-साडेबाराशे शतकानंतरही नीट उमगलेले नाही.

वारी परंपरेत ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे सामील करून घेतले. त्याला व्यापक स्वरूप पुढे अनेक संतांनी आणले. संत एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लाप्पा वासकर यांसारख्या अनेक संतांनी वारीची ही परंपरा पुढे नेत जागवली. जशी संत ज्ञानेश्वरदेवांच्या घरात वारीची परंपरा होती. तशीच संत तुकाराम महाराजांच्या घराण्यातही वारीची परंपरा होती. संतसाहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात, ‘पंढरीची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही प्रथा ज्ञानदेवपूर्वकालीन आहे. वारीतून या सांप्रदायाची सामाजिकता आणि समाजभिमुखता स्पष्ट होते.’ वारींची परंपरा सर्व जातींना एकत्र आणणारी आहे. ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा सांप्रादाय जनमानसावर प्रभाव गाजवू शकला आहे आणि तो महाराष्ट्रव्यापी झाला आहे. आज तर या राज्याच्या सीमारेषा ओलांडून आंध्र, तामिळनाडू, पंजाब आदी राज्यांतून भक्तगण या सोहळ्यात सहभागी होत आहेत; परंतु खऱ्या अर्थाने या सांप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त पुंडलिक ठरतो. भक्त पुंडलिकापासून या सांप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते, असे संत वाङ्मयाचे अभ्यासक मानतात. असे जरी असले तरी संत वाङ्मयाच्या चळवळीचे खरे प्रणेते ज्ञानेश्वर माऊलीला मानले जाते, कारण भागवत धर्माचा विचार ज्ञानदेवांनी या मातीत रुजविला. तो काळ अनिष्ट रूढी-बंधनाने ग्रासलेला. चातुरवर्ण्य व्यवस्थेचे पेव फुटलेले. जातिभेदाने माणसा-माणसांतील माणूसपण संपलेले. अशा काळात ज्ञानेश्वर माऊलीने समता-बंधुत्वाचा विचार भागवत धर्माद्वारे मांडला, तेव्हा वारीपरंपरेचा विचार करताना ही गोष्टही प्रेरणादायी ठरते. वारी परंपरेतील पालखी सोहळा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा, तुकाराम महाराजांच्या पालख्या निघत. संत निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी आदी संतांच्या पालख्याही गावोगावावरून निघतात. यात रिंगण फेरी आणि आश्वनर्तन सोहळ्यातून डोळ्यांचे पारणे फिटेल. हे सारे होत बघताना वारकरी प्रापंचिक दु:ख विसरतो. त्याचा जगण्यावरचा विश्वास वाढतो. इश्वराचे चिंतन करताना सदाचार एवढा एकच हेतू मनात ठेवून पुढे जावे, ही एकच शिकवण संत देऊन जातात. आजच्या स्पर्धात्मक युगात तो तर गुरूमंत्र ठरतो. म्हणून वारी परंपरा वर्षोनुवर्षे अधिकाधिक लोकांच्या मनात रुजत चालली आहे.

Comments
Add Comment