
अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी
पंढरपूर : आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) निमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. या आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावचे भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा सन्मान मिळाला. त्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी राज्यातील बळीराजा, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे.. सुजलाम सुफलाम होऊ दे.. पाऊस पडू दे.. प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे मागणे विठुरायाच्या चरणी केले.
या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. याशिवाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश ख्याडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.