
उनाकोटी : त्रिपुरा मधील जगन्नाथ रथ यात्रेत (Jagannath Rath Yatra) वीजेच्या धक्काने सात जणांचा मृत्यू झाला असून दहाहून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना त्रिपुरामधील उनाकोटी जिल्ह्यातील कुमारघाट येथे घडली.
कुमारघाट येथे भगवान जगन्नाथ रथ यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथांची रथ यात्रा मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात.
परंपरेनुसार, लोखंडाने बनवलेला रथ हजारो भाविक आपल्या हाताने ओढत होते. याचवेळी हा रथ रस्त्यावरील हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आला. त्यामुळे संपूर्ण रथामध्ये वीजेचा करंट उतरला. त्यामुळे रथावरील अनेक जणांना वीजेचा धक्का बसला. त्यामध्ये सात भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १० ते १५ जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. तर या घटनेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक भाजलेल्यांना एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच ४० टक्क्यांपेक्षा अधिक भाजलेल्यांना ७५ हजार रुपयांची मदत देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना त्रिपुराचे उर्जा मंत्री रतन लाल नाथ यांनी सांगितले की, या घटनेच्या चौकशीचे आदेश देऊन लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.