Wednesday, March 26, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमुलींनो आंधळं प्रेम करू नका!

मुलींनो आंधळं प्रेम करू नका!

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

चुकीच्या व्यक्तीवर आंधळा विश्वास, प्रेमाची आणि एकत्र जीवन जगण्याची, लग्नाची, लिव्ह इन रिलेशनशिप बाबतीत स्वप्नाळू आणि भ्रामक कल्पना, त्यातून घेतलेले चुकीचे निर्णय, आई-वडिलांना न जुमानता स्वतःचं भविष्य पणाला लावून शेवटी अतिशय हृदयद्रावक रितीने संपलेल्या अनेक तरुण मुली…

आजमितीला देशभरात अशी प्रकरणं पेटलेली आहेत. आजपर्यंत अनेक मुली खोट्या, फसव्या प्रेमाच्या आहारी जाऊन बळी गेल्यात, तरीही आजसुद्धा अनेक मुली त्याच चुकीच्या वाटेवर जाताना दिसतात. या लेखामार्फत आजच्या समस्त तरुण मुलींना एकच सांगणं आहे की, आपलं अतिशय सुंदर, छान आयुष्य, आपलं व्यक्तिमत्त्व, आपलं करिअर, आपलं कुटुंब, आपलं घर, आपले आई-वडील, भावंडं, नातेवाईक, अत्यंत जवळचे आणि खरे मित्र-मैत्रिणी याहून प्रिय आणि महत्त्वाचे जगात काहीही नाही. सर्वात महत्त्वाचे आपलं घर, आपलं गाव, आपलं शहर. तिथे तुमच्यावर आई-वडिलांची सावली आहे, सुरक्षा आहे, संरक्षण आहे, मायेची ऊब आहे. तेथून कायमस्वरूपी बाहेर पाय टाकताना थोडा तरी विचार करा. कोणत्याही मुलीला तरुण वयात, किशोर वयात मुलांना पाहून विशिष्ट भावना, हुरहूर, जवळीक, शारीरिक आकर्षण निर्माण होणे अतिशय नैसर्गिक आहे. पण याला प्रेम, खरं प्रेम समजण्याची गंभीर चूक जेव्हा मुली करतात आणि कसलाही विचार न करता त्यात वाहवत जातात, आपलं कुटुंब, करिअर पालक याही पलीकडे त्यांना कोणी दुसरा महत्त्वाचा वाटतोय? असं का होत?

खरं तर अनेकदा संपूर्ण आयुष्य गेलं तरीही खरं प्रेम कोणालाच मिळालेलं नसतं, मिळत नसतं. खूप कमी उदाहरणं अशी असतील जिथे प्रेमविवाह शंभर टक्के यशस्वी झाले असतील, ठरवून केलेल्या लग्नाची पण फारशी वेगळी परिस्थिती नाही. अनेकदा रितसर केलेली लग्ने सुद्धा तडजोड असतात. समाज, कुटुंब यांच्या दबावाखाली ती रेटून नेलेली असतात. बाहेरील समाजात सुरू असलेले विवाहबाह्य प्रकरणे, सातत्याने बॉय फ्रेंड्स, गर्ल फ्रेंड्स बदलण्याची तरुणांमधील फॅशन, विवाहितांच्या आत्महत्या, घातपात, बलात्कार, विनयभंग, वाढते वेश्या व्यवसाय, छेडछाडीची प्रकरणं, महिलांचे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण, एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, मुलींना अश्लील व्हीडिओ, मेसेज यातून ब्लॅकमेल करणे, मुलींची सामाजिक बदनामी होईल असे वर्तन करणे, यातून समाज कोणत्या थराला जात आहे, याची पूर्ण कल्पना तरुण मुलींना असणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला अतिशय अल्लड, अर्धवट वयात भेटलेला मुलगा, जो नोकरी-धंद्यात देखील स्थिर नाही, ज्याचं शिक्षण पूर्ण नाही, जो एक रुपया कमवत नाहीये, किंवा सेटल असेल तरी ज्याच्या बाबतीत आपल्याला फारशी इतर माहिती नाहीये, असा मुलगा आयुष्याचा जोडीदार म्हणून का निवडला जातोय? त्याच्यासोबत सगळ्या मर्यादा ओलांडून आपण कसे वाहवत जावू शकतो?

ज्याचे आपल्यावर प्रेम आहे, आपल्याशिवाय जगू शकणार नाही, आपला दुरावा सहन करू शकणार नाही असली वचने, शपथ, वायदे देतोय, मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे म्हणतोय, मी तुला सोडणार नाही, अशी भावनिक वक्तव्य करतोय आणि त्याचवेळी प्रेमाच्या नावाखाली आपल्याला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडतोय. लग्न न करताही आपण एकत्र राहुयात असे पर्याय देतोय? आपल्याला वेळोवेळी भावनिक करून आई-वडिलांचे घर सोडायला प्रवृत्त करतोय, पळून जावून वेगळं राहू, कोर्टात लग्न करू, शून्यातून जग निर्माण करू असले डायलॉग मारतोय तो खरा प्रेमवीर आहे, असं आपल्याला का वाटतं? जो मुलगा आपल्याला शाळा-कॉलेजचे वर्ग बुडवून फिरायला चल म्हणतोय, आपलं शिक्षण सोडायला सांगतोय, घरातल्यांना खोटं सांगून लपून छपून आपल्याला भेट म्हणतोय, स्वतः देखील तेच उद्योग करतोय, जो इकडून तिकडून उधार पैसे मागून आपल्याला गिफ्ट ग्रीटिंग, हॉटेलिंग, लाँग ड्राईव्ह असले प्रकार फक्त इंप्रेस करायला करतोय, तो प्रेम करण्याच्या लायकीचा आहे का? त्याचं भविष्य काय हा प्रश्न आपल्याला पडत नाही का? जो स्वतःची वासना भागवायला आपल्याला कोणत्याही खालच्या दर्जाच्या लॉजवर नेतोय, कोणाच्याही खोलीत नेतोय, निर्जन निर्मनुष्य ठिकाणी नेतोय, तिथे कधीही काहीही चुकीचं घडू शकते, हे माहिती असूनपण आपण सोबत असताना अशी भयंकर रिस्क घेतोय, आड बाजूला, आडोशाला नेऊन अथवा सार्वजनिक ठिकाणी जो आपल्यासोबत शारीरिक अश्लील चाळे करतोय, तो प्रेम करत असतो का? लग्न करण्याच्या आधीच आपल्याकडे शारीरिक सुखाची अपेक्षा करणारा, आपल्याला चुकीचे मार्ग दाखवणारा, त्याच्या मित्रांमध्ये आपल्याबद्दल चर्चा करून आपल्याला बदनाम करणारा, स्वतःच्या मूड आणि गरजेनुसार आपल्याला वापरणारा, वेळी अवेळी आपल्याला कुठेही भेटायला बोलावणारा, कोणत्याही वेळी कुठेही आपल्याला फोन, मेसेज करत राहून अडचणीत आणणारा खरं प्रेम करणारा असेल का? लग्नाआधीच आपल्याला आपले अश्लील फोटो व्हीडिओ, मोबाइलवर पाठवायला सांगून, तसेच विविध वेबसाईटवरील व्हीडिओ, फोटो आपल्याला दाखवून आपल्यासोबत त्याची मजा घेणारा व्हीडिओ कॉलमार्फत आपल्याकडून चुकीचं कृत्य करून घेणारा, निस्सीम प्रेम करतोय असं आपल्याला का वाटतं? चोवीस तासातले एक-दोन अथवा तीन तास जरी तो आपल्यासोबत घालवत असेल, तर उरलेल्या वेळेत तो नेमकं काय करतोय, कुठे असतो, कुठे जातो, कोणासोबत कोणत्या अवस्थेत असतो, व्यसन करतो का? याबद्दल आपल्याला खरी माहिती असते का? त्याच्या घरातील लोकांची, मित्रांची, त्याच्या सगळ्या चांगल्या-वाईट सवयीची, त्याच्या खऱ्या स्वभावाची, त्याच्या गुण-दोषांची आपल्याला काहीही शाश्वत माहिती नसताना फक्त त्याचं वरवरचं बोलणं आपल्याला प्रेम का वाटतं? अशा प्रकारच्या एखादा मुलावर जरी आपण मनापासून प्रेम केलं तरी त्याला त्याची कितपत किंमत आहे? तो आपलं प्रेम शेवटपर्यंत निभावण्याच्या मानसिकतेमधला आहे का? तो स्वतः तेवढा सक्षम आहे का? प्रामाणिक आहे का? तो आयुष्यात कधीही बदलणार नाही याची खात्री आपण कशी आणि कुठून करणार आहोत? असे असंख्य प्रश्न आहेत, जे मुलींनी स्वतःला विचारणे गरजेचे आहे.

स्वतःच्या आई-वडिलांचे हक्काचं घर सोडून, सर्व सुखसोयी, करिअर, चांगलं लग्नाचं स्थळ, चांगला मिळू शकणारा नवरा सोडून कोणत्याही मुलासोबत कुठेही मिळेल तिथे भाड्याने घरं घेऊन राहणं, पुढे दोघांनी मिळेल ती नोकरी-व्यवसाय करून पोट भरणे, जमलंच तर रजिस्टर लग्न करणं अथवा तसंच एकत्र राहणं या संघर्षांमध्ये आपलं खरं म्हणवणारं प्रेम टिकणार आहे का? बाहेरच्या जगातील ठोकरा लागल्यावर, दररोज आव्हान उभी राहिल्यावर, राहणीमान, कपडे खाणे-पिणे याचा दर्जा घसरल्यावर, एकमेकांच्या सवयी खटकू लागल्यावर आपलं स्वप्नातल प्रेम तग धरू शकणार आहे का? हा विचार मुलींनी करावा. आपलं आंधळं प्रेम आपल्याला त्याच्याविरुद्ध कोणतंही कठोर पाऊल उचलू देत नाही, कारवाई करू देत नाही. परत परत चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन आपण किती दूर निघून आलोय याची जाणीव पण आपल्याला होऊ नये का? हे सगळं सहन करत असताना पण आपल्याला जन्मदात्या आई-वडिलांना संपर्क साधावा, त्यांची मदत मागावी. स्वतः शारीरिक, मानसिक, भावनिक नुकसान होऊन पण मुलींना माघारी फिरावसं का वाटत नाही? जो आपला तिरस्कार करू लागला आहे, आपल्याला टाळू लागला आहे, त्याच्यासमोर इतकं लाचार होऊन जगण्याची गरज काय? आपला आत्मसन्मान कुठेच जागा होत नाही का? खोटे बोलून ज्यानं आपल्याला फसवलं, विश्वासघात केला, आपल्या प्रेमाचा गैरफायदा घेतला, ज्याच्या दुष्ट, विकृत, त्रासदायक वागणुकीमुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं, ज्याच्या निष्काळजी आणि बेजबाबदार वर्तवणुकीमुळे आपल्याला वाईट दिवस आलेत, त्याच्याच सोबत परत परत राहण्याचा अट्टहास का आणि कशासाठी? ज्याच्यामुळे आई-बाप दुरावले, जवळचे सगळे लांब झाले तरीही असं नातं टिकवण्याची मुलींची धडपड, तो सुधारेल, बदलेल ही दुबळी आशा, आपलं प्रेम, आपली ओढ त्याला बदलायला भाग पाडेल हा मूर्खपणाचा कहर आणि यातूनच एक दिवस जीवनाचा अंत झालेली सुशिक्षित, सुसंस्कृत, चांगल्या घरातील मुलगी हे विदारक सत्य आज समाजात पाहायला मिळते आहे. मुलींनो हे बदला, स्वतःला बदला, स्वतःच्या स्वप्नांना बदला, विचारांना बदला, आपला दृष्टिकोन बदला. आपलं आयुष्य इतकं स्वस्त आणि किरकोळ नक्कीच नाही. कोणत्याही कसायाच्या हातून आपण मरावं यासाठी आपल्याला पालकांनी जन्म दिलेला नाही. आपल्या आई-वडिलांनी आपला असा विदारक अंत पाहावा इतके दुर्दैवी त्यांना बनवू नका. सर्व तरुण मुलींनी स्वतःला हे सर्व प्रश्न विचारा आणि वेळेत स्वतःला सावरा. प्रेमाच्या नावाखाली स्वतःची इज्जत स्वतःचा जीव गमावून बसू नका.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -