वैष्णवांच्या मांदियाळीने अवघी दुमदुमली ही पंढरी
- सूर्यकांत आसबे
सोलापूर : आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा उद्या गुरुवारी लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत पंढरीत पार पडत आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला पंढरीत सुमारे १० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे. श्री विठुरायासह रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेतही २ लाखावर भाविक उभे आहेत. ही दर्शन रांग पत्राशेडच्या बाहेर गोपाळपूर रस्त्यावर गेली आहे. वैष्णवांच्या मांदियाळीने अवघी पंढरी दुमदुमली आहे.
पाऊस, वारा, उन्हाचा चटका बसू नये म्हणून दर्शन रांगेट शेडनेटची सावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भाविक भक्तीत तल्लीन असल्याचे चित्र दिसून येते.आषाढी एकादशीला आलेले भाविक चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे एकादशी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंट फुलले आहे. भाविक स्नानाचा आनंद घेत आहेत. श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविक रांगेत उभे आहेत. दर्शन रांग पत्राशेडमध्ये पोहचलेली आहे. या दर्शन रांगेत २ लाखाहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत.मंदिर समितीच्यावतीने वॉटरप्रूफ दर्शन रांग उभारण्यात आली आहे.पत्राशेड येथे कायमस्वरुपी ४ तर तात्पुरते ६ असे १० दर्शन शेड उभारण्यात आलेले आहेत. तसेच भाविकांसाठी खिचडी, चहा, पाणी, ताक, मठ्ठा आदींची मोफत व्यवस्था करण्यात आली असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगीतले.
६५ एकरात भक्तीचा मळा
भक्तीसागर ६५ एकर येथे देखील भाविक तंबू, राहुट्या उभारुन भजन, किर्तन व प्रवचनात दंग झालेले आहेत. येथेही लाखाहून अधिक भाविक आहेत. या ठिकाणी जणू भक्तीचाच मळा फुलला आहे. तर भाविकांची वारी सुरक्षित पार पडावी म्हणून ८ हजार पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसेच मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग, ६५ एकर व शहरातील महत्वाच्या ठिकाणी बसवलेल्या ३०० सीसीटीव्हीची करडी नजर आहे.
दर्शन रांगेत गर्दी वाढली
आषाढ वारी मोठ्या प्रमाणात भरू लागली आहे. दर्शन रांगेत गर्दी होऊ लागली असून रांगेत २ लाखापेक्षा जास्त भाविक आहेत.माऊली, तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसमवेत सुमारे ७ लाख भाविक आहेत.
पालखी सोहळे पंढरीत
बुधवारी दशमी दिवशी सकाळी वाखरीतून पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी पंढरीत दाखल झालेल्या मानाच्या पालख्या वाखरी येथे गेल्या आणि तेथे संत भेटीचा कार्यक्रम झाला. सोमवारी संत मुक्ताबाईंची पालखी पंढरीत दाखल झाली. तर मंगळवारी शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी दाखल झाली आहे. संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळासुद्धा विठुरायाच्या नगरीत पोहोचला आहे .यासह अनेक लहान मोठ्या दिंड्या पंढरीत दाखल झाल्या आहेत .वाखरीचा मुक्काम संपवून बुधवारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालखी आणि दिंड्यांनी सायंकाळी पंढरीत प्रवेश केला. यावेळी मोठ्या भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याचे पंढरपूरकरांनी स्वागत केले.