पुणे : भोपाळमध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. मोदींच्या या आरोपाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी ज्या शिखर बँकेचा मुद्दा काढला. त्या बँकेचा मी कधीही साधा सदस्य नव्हतो. त्यात माझा काही संबंध नसल्याचे कोर्टात सिद्ध झाले आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
भोपाळमध्ये मोतीलाल नेहरु स्टेडियममध्ये ‘माझे बूथ, सर्वात मजबूत’ या मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण करताना पंतप्रधान मोदी पवारांवर टीका करताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या पक्षावर जवळपास ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खोदकाम घोटाळा अशी यांची मोठी यादी आहे, असे मोदी म्हणाले.
यावर शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांबद्दल काय बोललं पाहिजे याचा नमुना आज मोदींनी देशासमोर ठेवला, असे म्हणत पवारांनी मोदींना खास पुणेरी टोमणा लगावला. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे. देशाच्या पंतप्रधानांनी जे आज आरोप केले ते कितपत योग्य म्हणावे. कारण त्यांनी ज्या शिखर बँकेचा मुद्दा काढला. त्या बँकेचा मी कधीही साधा सदस्य नव्हतो. तर कधी लोन किंवा कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही. त्यात माझ्यावर आणि पक्षावर केलेले आरोप चुकीचे आहेत.
विशेष बाब म्हणजे यापूर्वी देखील शिखर बँकेतील गैरव्यवहाराची चर्चा झाली. हे सर्व प्रकरण कोर्टात गेले. त्यात माझा काहीच संबंध नसल्याचे सिद्ध झाले आहे. तरी देखील असे आरोप करणे हे काही योग्य नाही, अर्थात यावर मला काहीही बोलायचे नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
तुम्हाला शरद पवारांच्या मुलीचे भलं करायचे असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला मतदान करा, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे केली होती. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, अशा प्रकरणात सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले त्याचे काही कारण नाही. अशा इन्स्टिट्यूट सोबत त्या राहत नाहीत हे बहुतांश लोकांना माहित आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर देशातील विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात, देशातल्या समस्यांबाबत चर्चा करतात, ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची विधाने केली जातात, यापेक्षा अधिक बोलण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत पवारांनी मोदींच्या आरोपांवर अधिक बोलणे टाळले.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra