
भाईंदर : काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्सोवा येथे वसई खाडीवर बांधण्यात आलेल्या नवीन पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर २८ मार्चला वाहन चालकासाठी नवीन वर्सोवा पूलाची एक मार्गिका खुली करण्यात आली होती. मात्र पहिल्याच पावसात वर्सोवा पुलावर काही ठिकाणी खड्डे पडण्यास सुरवात झाल्याचे दिसून येत आहे.
यामुळे अपघात होऊ शकतात. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व पुलावर पडलेले खड्डे लवकर भरावेत व अपघात होण्यापासून टाळावे अशी मागणी करण्यात येत आहे. मीरा-भाईंदर महानगर पालिका व वसई -विरार महानगर पालिका याच बरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व इतर संबंधित विभागांशी पत्र व्यवहार करून संपर्क साधून लवकरात लवकर पुलावर, रस्त्यावर पडलेले खड्डे भरून घेण्यास सांगण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त मुख्यालय प्रकाश गायकवाड यांनी सांगितले आहे.
नवीन वर्सोवा पुलाची वाहन चालकासाठी एक मार्गिका खुली करण्यात आली आहे. मुंबई ते सुरत, ठाणे ते सुरत ही वाहिनी वाहन चालकासाठी सुरू करण्यात आली आहे. नवीन वर्सोवा पूलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होत आहे मात्र पूल असून पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबई - अहमदाबाद महामार्ग व ठाणे कडे जाणाऱ्या घोडबंदर मार्गाचे वर्सोवानाका हे मुख्य जंक्शन आहे.नवीन पूल फाऊंटन हॉटेल समोरील पेट्रोल पंपा पासून सुरू होऊन ससूनगर पर्यंत असा एकूण २ ते २.३० किलोमीटरचा आहे. नविन पूल सुरू झाल्या नंतर आता चौकाच्या कामासाठी सुरवात करण्यात येणार आहे. वर्सोवा खाडीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा कडून नवीन पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु करण्यात आले होते मात्र कोरोनाच्या काळात काम बंद असल्याने व काही इतर तांत्रीक अडचणीमुळे दिलेला कालावधी पूर्ण झाल्या नंतरही नवीन पुलाचे काम पूर्ण होण्यास विलंब लागला होता. वर्सोवा पुलावर पडलेले खड्डे लवकर भरले गेले नाहीत तर पावसाळ्यात त्यात पाणी जमा होऊन वाहन चालकांना खड्डा न दिसल्याने नक्कीच दुचाकी वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता आहे.