रेल्वे सेवा धीम्या गतीने
मुंबई ( प्रतिनिधी ): मुंबईत (Mumbai) अधूनमधून येणाऱ्या पावसाचा जोर आज चांगलाच वाढला. आज बुधवार सकाळपासून मुंबईसह उपनगरात (Mumbai Suburban) पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले. तर अंधेरी भुयारी मार्ग (Andheri Subway) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आज मालाड व गोरेगाव येथे झाड अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
बुधवारी सकाळपासून बरसणाऱ्या पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळित झाली तर अनेक बस मार्गात बदल करण्यात आला. मुंबई उपनगरीय लोकल सेवा उशीराने धावत होत्या. मुंबईत येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत शनिवारपासून दाखल झालेल्या पावसाने दमदार सुरुवात केली असून . उघडझाप करणाऱ्या पावसाचा जोर आज बुधवारी वाढला. मुंबई महापालिकेने पाणी साचणा-या सखल भागात आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. सकाळपासून सुरुवात केलेल्या पावसाने दुपारपर्यंत जोरदार बरसला. अंधेरी सबवेत तर पहिल्याच पावसात पाणी साचले होते. बुधवारीही पावसामुळे येथे पाणी साचल्याने हा सबवे बंद ठेवण्यात आला होता. महेश्वरी उद्यान , गांधी मार्केट, दादर टीटी, चेंबूर येथील शेल कॉलनी, कुर्ला, घाटकोपर, दहिसर, धारावी, विद्याविहार, भांडुप, विक्रोळी, मालाड- मालवणी, गोरेगाव, मुलुंड आदी सखळ भागात पाणी साचले. मुंबई महापालिकेने पंप लावून पाण्याचा उपसा केल्याने काही वेळातच पाण्याचा निचरा झाला. अंधेरी भुयारी मार्ग येथे पाणी तुंबल्याने हा सबवे पाण्याचा निचरा होईपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. पाण्याचा निचरा या परिसरातील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली होती. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या. मालाड येथे अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू झाला. काही ठिकाणी घराच्या भिंती, भिंतीचा भाग कोसळला. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. दरम्यान. येत्या २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शनिवारपासून बरसणाऱ्या पावसामुळे गेल्या पाच दिवसांत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई शहरात ४ ठिकाणी, उपनगरांत ८, पश्चिम उपनगरांत १४ अशा २६ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या कोसळल्या. मालाड येथे अंगावर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मुंबई शहरात १, पूर्व उपनगरांत ३ व पश्चिम उपनगरांत १ अशा पाच ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या.जोरदार पावसामुळे अंधेरी सबवेत पाणी तुंबल्याने हा सबवे बंद ठेवण्यात आला होता. येथील वाहतूक एस. व्ही मार्गाने वळवण्यात आली. वाहतुकीच्या खोळंल्याने या मार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांची गैरसोय झाली. महापालिकेने येथे पंप लावून पाण्याचा निचरा केल्याने काही वेळात येथील वाहतूक सुरळीत झाली.
पाच दिवसांत आठ मृत्यू
मुंबईत पहिल्याच पावसात दुर्घटनांचे सत्र सुरु आहे. मान्सून सक्रिय झाल्यापासून गेल्या फक्त पाच दिवसांत पावसासंबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारपासून मुंबईत पावसाने बरसायला सुरुवात केल्यापासून मुंबईत पडझडीच्या घटनाही घडत आहेत. शनिवारी पहिल्या दिवशी गोवंडीत ड्रेनेज लेनमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला. तर रविवारी घाटकोपर येथील तीन मजली इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. तर रविवारी विलेपार्ल्यातही एका इमारतीचा भाग कोसळून दोघांना जीव गमवावा लागला. रविवारी एकाच दिवशी इमारत कोसळण्याचा दोन घटनांत चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर आज झाड अंगावर कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला.
ठाणे येथील वृंदावन सोसायटी येथे पाणी साचल्याने बेस्टने घाटकोपर आगार ते वृंदावन सोसायटी दरम्यान धावणाऱ्या ४९९ मर्यादितवरील बस दुपारी २.४५ ते पासून श्रीरंग सोसायटीपर्यंत खंडित केल्या. दहिसर केतकी पाडा येथे पाणी तुंबल्याने बेस्टने बस क्रमांक ७०२ मर्यादित, ७०५ मर्यादित व ७०९ मर्यादित वरील बस फेऱ्या कोकणी पाडा पुलावरून दुपारी २ वाजल्यानंतर वळवल्या होत्या. बोरिवली पूर्वेकडील स्थानक मार्गावर पाणी तुंबल्याने बस क्रमांक ए २९८, ए ३०१, ५२४ मर्यादित व सी ७०० वरील बस कस्तुरबा मार्ग ७ येथून वळवण्यात आल्या होत्या. तर शक्ती नगर दहिसर पूर्व येथे पाणी भरल्याने बस क्रमांक ए २०८ वरील बस आशिष संकुल मार्गे वळवण्यात आल्या होत्या .
पावसाची नोंद –
शहर – १२.४४ मिमी
पूर्व उपनगर – ४२.४१ मिमी
पश्चिम उपनगर – ४०.४६ मिमी