पंढरपूर: आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पंढरपुरात (Pandharpur) दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे अनेक मंत्रीही दाखल झाले आहेत. मध्यरात्रीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे.
उद्या पहाटे मुख्यमंत्री विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मंदिरात जातील. शासकीय पूजेनंतर मंदिर समितीकडून होणार सत्कार स्वीकारून ते पहाटे साडे चार वाजता विश्रामगृहाकडे निघणार आहेत. सकाळी १० वाजता विश्रामगृह येथे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता तीन रस्ता येथे आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या अन्नदान कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेत. दुपारी ११.३० वाजता तीन रस्ता येथे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबिरात जाऊन वारकऱ्यांशी संवाद आणि महाशिबीराची पाहणी करणार आहेत. दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट देणार असून तेथून पुन्हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने सोलापूरकडे रवाना होतील.
मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, अब्दुल सत्तार अशी मंत्र्यांची फौज पंढरपूर मध्ये दाखल होणार झाली आहे. याचसोबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेदेखील आषाढी सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.