सहारनपूर: भीम आर्मीचे संस्थापक, अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण (Chandrashekhar Azad Ravan) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद परिसरात हा प्राणघातक हल्ला झाला. आझाद जखमी झाले असून त्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, काही अज्ञातांनी चंद्रशेखर आझाद यांच्या कारवर गोळीबार केला. आझाद यांच्या कमरेजवळून एक गोळी चाटून गेली असल्याची माहिती आहे. कारच्या काचाही फुटल्या आहेत. गोळीबारानंतर चंद्रशेखर आझाद यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी एसएसपी डॉ. विपिन टाडा सहारनपूर यांनी पोलीस महासंचालक विजय कुमार यांना फोनवरून घटनेची संपूर्ण माहिती दिली.
गोळीबाराच्या या घटनेनंतर भीम आर्मीने संताप व्यक्त केला आहे. आरोपींना तातडीने अटक करावी आणि चंद्रशेखर आझाद रावण यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी करण्यात आली आहे. आरएलडीचे स्थानिक आमदार मदन यांनी सांगितले की, सध्या रावण यांची प्रकृती स्थिर असून कोणाताही धोका नाही. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोरांनी वापरलेल्या कारवर हरयाणा राज्याची नंबर प्लेट होती, अशी माहिती समोर आली आहे.
चंद्रशेखर आझाद यांनी काय म्हटले?
चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले की, गोळीबार झाला तेव्हा माझ्यासोबत काहीजण होते. गोळीबारानंतर स्थानिक पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क साधला. हल्लेखोरांबाबत आता व्यवस्थित आठवत नाही. मात्र, माझ्या सोबत असणारे कार्यकर्ते त्यांना ओळखू शकतील. गोळीबारानंतर हल्लेखोरांची कार सहारनपूरच्या दिशेने गेली. तर, आमच्या कारने यु-टर्न घेतला. हल्ला झाला तेव्हा माझ्या लहान भावासोबत आम्ही पाचजण कारमध्ये होतो.