
सखल भागात शिरले तीन फूट पाणी
भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी शहर व ग्रामीण भागात बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा शहरातील नालेसफाईची पोलखोल झाली आहे. गुरुवारी बकरी ईद व आषाढी एकादशी असल्याने शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी भिवंडी शहरातील तीनबत्ती येथील भाजी मार्केट,मच्छी व चिकन मार्केट असलेल्या बाजारपेठ परिसरात रस्त्यावर २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचल्याने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली.
येथील अनेक दुकानात पाणी शिरल्याने दुकानांमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच नदी नाका, म्हाडा कॉलनी, इदगाह, मंगल भवन, कमला हॉटेल, अंजूर फाटा या परिसरात सुध्दा मोठ्या प्रमाणा वर पाणी साचले होते.त्यामुळे या भागातील अनेक भागात दुकानांमध्ये पाणी शिरले. तर धामणकर नाका ते कल्याण नाका दरम्यान रस्त्या लगतच्या गटारींची सफाई न झाल्याने रस्त्यावर तीन फुटापर्यंत पाणी साचल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. तर पाणी शिरल्याने दुचाकी बंद पडल्या होत्या. सखल भागासह बाजारपेठेत पाणी शिरण्याला महानगर पालिका प्रशासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून केलेली नालेसफाई झाली नसल्याचे खापर नागरिकांकडून फोडले जात आहे.