
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्टयांच्या दृष्टीकोन मार्गात फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जित करणारी वस्तू, पतंग आदींमुळे विमानांचे सुरक्षित अवागमन धोक्यात येते. त्यामुळे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात उंच उडणारे फटाके उडवणे, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू सोडणे, पतंग उडवणे आणि लेझर बीम प्रकाशित करणे, फुगे, पॅराग्लायडर्स उडविण्यावर बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत लागू करण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.
कोणत्याही विमानाच्या लँडिंग, टेक ऑफ आणि अवागमनामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर केल्याचे लक्षात येताच कोणतीही व्यक्ती जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती देईल. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.