
वारकऱ्यांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळ सज्ज
- देवा पेरवी
पेण : आषाढी एकादशी निमित्त (ashadi ekadashi) आपल्या लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी (Pandharichi Wari) यापूर्वीच मार्गस्थ झाले आहेत. तरी देखील पुढील दोन दिवसांत अनेक वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असतात. हे वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असताना त्यांची प्रवासाची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याचा विचार करून रायगड जिल्हा एसटी महामंडळाने रायगड जिल्हयातील आठ आगारातील ५१ गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. यामध्ये स्वारगेट येथे ५० गाड्या रवाना करण्यात आल्या असून आयत्या वेळच्या पंढरपूर ग्रूप बुकिंगच्या माध्यमातून एक गाडी अशा एकूण ५१ गाड्या रायगड विभागीय एसटी महामंडळाने सज्ज ठेवल्या आहेत. वारकऱ्यांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळ सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी सांगितले.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. असे असले तरी अनेक वारकरी भगवंताच्या दर्शनासाठी विविध प्रकारच्या वाहनांनी देखील प्रवास करून पंढरपूर येथे रवाना होत असतात. त्यामुळे त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि प्रवास देखील सुखरूप व्हावा या दृष्टीने ज्या ठिकाणाहून वारकऱ्यांचा अधिक प्रवास होत असतो अशा ठिकाणी म्हणजेच स्वारगेट येथे रायगड जिल्हा एसटी महामंडळाने पन्नास गाड्या रवाना केल्या आहेत. तर एक बुकिंगची गाडी देखील रवाना होणार आहे.
एसटी महामंडळाने आजपर्यंत प्रत्येक सण-वारांना किंवा उत्सव, आपत्ती, लग्न समारंभ आदी गोष्टींसाठी बसेस उपलब्ध करून मोठी जबाबदारी पार पाडली आहे. आज देखील आषाढी एकादशीसाठी वारकऱ्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी एसटी महामंडळाने अधिकच्या बसेस देऊन पुढाकार घेतल्याने वारकरी मंडळी एसटी महामंडळाचे आभार मानत आहे.
वारकऱ्यांची पंढरपूर पर्यंत पोहोचण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी एसटी महामंडळाचा दरवर्षी सिंहाचा वाटा असतो. यावर्षी देखील त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून वारकऱ्यांना प्रवासात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घेतली असून जादा गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे आम्ही स्वागत करत आहोत. - ह. भ. प. अमित महाराज - बळवली