तलावात फक्त सात टक्के पाणीसाठा शिल्लक
मुंबई : गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असला तरी मान्सून लांबल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत सद्यस्थितीत केवळ ७ टक्के पाणी शिल्लक आहे. हे पाणी पुढील फक्त २६ दिवस पुरणारे असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा होईपर्यंत १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात मिळून सद्यस्थितीत ६.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. या संदर्भात मुंबई महापालिकेच्या जल विभागाने हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता त्याला काल मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे एक जुलैपासून मुंबई दहा टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.