भारतीय रेल्वेला गौरवशाली असा इतिहास आहे. १८५३ मध्ये इंग्रजांनी सुरू केलेली ठाणे ते बोरीबंदर म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकादरम्यान पहिली रेल्वे सुरू झाली होती. म्हणजे १५० पेक्षा अधिक वर्षांची परंपरा रेल्वेला लाभली आहे. तेव्हापासून देशात रेल्वे धावत आहे. केवळ धावतेच असे नव्हे; तर मोठ्या प्रमाणात विस्तारही झाला आहे. आता तर अत्याधुनिक आणि सर्व सोई-सुविधा निर्माण करून देण्यात आलेली ‘वंदे भारत’ ही गाडी देशभरात धाऊ लागली आहे. रेल्वेच्या इतिहासात आणखी या गाडीमुळे भर पडली आहे. सध्या मुंबई-पुणे दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन, मुंबई-फिरोजपूर दरम्यान धावणारी पंजाब मेल, मुंबई-नागपूर दरम्यानची त्यानंतर गोंदियापर्यंत चालवण्यात येणारी विदर्भ एक्स्प्रेस अशा काही गाड्यांना इतिहास आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तसेच मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ही त्यातील एक. या गाड्यांनी नावलौकिक मिळविला आहे. आता तर हजारो गाड्या रेल्वे रुळांवरून धावताहेत. त्यातच वंदे भारतसारख्या गाड्यांची भर पडत आहे. एका दृष्टीने भारताच्या प्रगतीचे हे लक्षण आहे, असे म्हटल्यास कोणतीही अतिशयोक्ती होणार नाही. कारण सतत प्रगती होत राहणे, हे जिवंत राहण्याचे द्योतक आहे. आज रेल्वेमध्ये कितीतरी गाड्यांची भर पडली आहे. जगभरातील रेल्वे जाळ्यांपैकी भारतातील रेल्वेचे तिसऱ्या क्रमांकाचे भारतीय रेल्वेचे जाळे मानले जाते. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ताशी ३५० किमी इतक्या वेगाने धावणाऱ्या गाडीचे स्वप्न आहे. अत्यंत वेगवान धावणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी जमिनीचे भूसंपादन, बाधितांना मोबदला, सर्वेक्षण अशी कामे पूर्ण झाल्यानंतर ती अहमदाबाद ते मुंबई दरम्यान ही बुलेट ट्रेन धावणार आहे. ही गाडी सुरू झाल्यावर मोठीच ऐतिहासिक क्रांती देशात आणि रेल्वेच्या इतिहासात होईल. तद्वतच मुंबई -अहमदाबाद हा वेगवान प्रवासही होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी मध्य प्रदेशातील महत्त्वाचे शहर असलेल्या भोपाळ येथून पांच ‘वंदे भारत’ गाड्यांना हिरवा कंदील दाखवून या गाड्यांना प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये मडगाव-मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाडीचाही समावेश आहे. या वर्षात देशभरात ‘वंदे भारत’च्या ७५ गाड्या देशभरात चालवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मडगाव-मुंबई अशी संपूर्ण दऱ्या, डोंगर, बोगदे पार करीत कोकणातून ही गाडी धावू लागल्याने गोवा आणि कोकणवासीय चाकरमानी यांची मोठीच अडचण दूर होऊन सोय तर झाली पण ही गाडी कोकणासाठी वरदान ठरणार आहे. सध्या तुतारी, कोकण कन्या, मुंबई-मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी, सकाळी धावणारी मांडवी एक्स्प्रेस आणि केरळ, कोकणातून धावणाऱ्या; परंतु इतरत्र जाणाऱ्या गाड्या कमीच आहेत. तसेच करमाळी-मुंबई दरम्यानची ‘तेजस’ एक्स्प्रेस ही एक चांगली गाडी प्रवाशांच्या सेवेत आहे. तरीही गाड्यांची संख्या कमी, तर प्रवाशांची संख्या जास्त अशी परिस्थिती आहे. कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा ठिकाणी राहतात. त्यामुळे सतत काहीना काही कामांमुळे त्यांना कोकणात जावे लागते. विशेषकरून होळी, गणपती आणि दिवाळी या तीन महत्त्वाच्या सणांना ते हमखास कोकणात जातातच. उलट या सणांना रेल्वेला, एसटी महामंडळाला जास्तीच्या गाड्या सोडाव्या लागतात. शिवाय कार, ट्रॅव्हल्स गाड्या असतातच. इतके असूनही कोकणात जाण्यासाठी गर्दी असतेच. त्यात आता ‘वंदे भारत’ची भर पडल्यामुळे कोकणवासीयांची मोठीच सोय झाली आहे. शिवाय आरामदायी प्रवास या गाडीमुळे त्यांना शक्य झाला आहे. देशभरात ७५ गाड्या चालवण्याचे रेल्वेचे लक्ष्य असले तरी देशभरात सध्या वंदे भारतच्या ३२ गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर आणि मडगाव-मुंबई अशा गाड्या सुरू झाल्या आहेत. शिर्डी आणि सोलापूर या दोन गाड्या अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरू केल्या. मडगाव-मुंबई दरम्यान धावणारी ही वंदे भारत गाडी पंधरा दिवसांपूर्वी सोडली जाणार होती; परंतु आसाम राज्यात नुकत्याच दोन गाड्या एकमेकाला भिडल्या. त्यामुळे मोठा अपघात झाला. त्यात २७५ पेक्षा अधिक प्रवाशांचे प्राण गेले, तर अनेकजण जखमी झाले. या अपघातामुळे मुंबई-मडगाव ‘वंदे भारत’ सुरू होऊ शकली नाही. पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते या गाडीचे उद्घाटन होणार होते. पण या अपघातामुळे त्याला ग्रहण लागले. त्यानंतर मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले.
असो. उशिरा का होईना मोदी यांच्या हस्ते भोपाळ स्थानकातून कोकणात जाणाऱ्या या गाडीला मंगळवारी हिरवा कंदील दाखवण्यात आला. उच्च तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या, अत्याधुनिक सोयी-सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, जेवण, नाश्ता आणि चहाची व्यवस्था गाडीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या या गाडीला खेड, रत्नागिरी, कणकवली असे थांबे देण्यात आले आहेत. सावंतवाडी हे मोठे स्थानक असूनही थांबा देण्यात अालेला नाही, तो देण्यात यावा अशी या भागातील प्रवाशांची मागणी अाहे. वंदे भारतचा वेगही बऱ्यापैकी असल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. अन्य प्रगतशील जसे इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, जपान, जर्मनी आदी देशात ज्याप्रमाणे गाड्यांची रचना, ठेवण, देखभाल आणि उपलब्ध असलेली साधने जशी निर्माण करून देण्यात अालेली असतात तशाच सुविधा आपल्या देशातील ‘वंदे भारत’ या गाडीत निर्माण करून दिल्या अाहेत. परदेशातील गाड्यांच्या धरतीवर भारतात गाड्यांची निर्मिती होऊ लागली असल्याने भारतही काही कमी नाही. प्रगतीच्या दिशेने ही वाटचाल सुरू असून विकासाचे पाऊल अधिक गतीने भारत उचलत आहे, हेच त्यातून सिद्ध होते. दिवसेंदिवस रेल्वेची प्रगती होत असताना प्रवाशांची काळजी, सुरक्षा करणेही तेवढंच महत्त्वाचे आहे. सिग्नल यंत्रणा, ट्रॅकची दुरस्ती, देखभाल वेळच्या वेळी झाली पाहिजे. आवश्यक असल्यास रूळ बदलले पाहिजे. असे झाले तरच प्रवासी समाधानी होतील आणि रेल्वेची विश्वासार्हता वाढेल आणि सुखकर प्रवासासाठी प्रवाशांची पसंती कायम राहील, याकडे रेल्वेने बघितले पाहिजे.