
लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी
पेण : भाजपने येत्या २०२४च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांची (Loksabha, Vidhansabha Elections) जोरदार तयारी चालवली आहे. गाव ते शहर अशी 'टॉप टू बॉटम' कार्यकर्त्यांची फळी सुसज्ज करण्याची रणनीती आखली आहे. त्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी प्रमुख नावे जाहीर करून त्यांच्यावर सदर मतदारसंघांची जबाबदारी सोपविली आहे. रायगड लोकसभेची जबाबदारी भाजपचे अनुभवी व निवडणूक विशेषज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे सतिश धारप यांच्यावर तर पेण -सुधागड -रोहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी तरुण नेते प्रसाद भोईर (Prasad Bhoir) यांच्याकडे सोपविली आहे.
प्रसाद भोईर यांनी त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने व त्यांची प्रशासनावर असलेल्या पकडीमुळे शिहू-कासू विभागासोबतच पेण खारेपाटण विभाग व नागोठणे -रोहा विभागात अल्पावधीत तरुण वर्गामध्ये खास आकर्षण निर्माण केले आहे. त्याचाच उपयोग भाजपाची पक्ष बांधणी व विस्तार यासाठी करण्याचा भाजप राज्य नेतृत्वाचा मानस असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, प्रसाद भोईर यांच्या निवडीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये व विशेषत: सर्वपक्षीय तरुणांमध्ये व सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला व सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पक्षाची संघटना अधिकाधिक बळकट करणार
प्रसाद भोईर यांनी पक्ष नेतृत्वाने अनपेक्षितरित्या एवढी मोठी जबाबदारी सोपविल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे मानस बोलून दाखविले. पेणचे आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची संघटना अधिकाधिक बळकट करण्याची व वरील दोन्ही नेत्यांचे हात अधिकाधिक बळकट करण्यासाठी ग्रासरूटला जावून अधिकाधिक मेहनत करण्याची तयारी प्रसाद भोईर यांनी बोलून दाखविली. लवकरच संपूर्ण पेण -सुधागड -रोहा विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून बूथ समित्या अधिक बळकट करून अधिकाधिक तरुणांना पक्ष संघटनेत जोडण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.