-
सेवाव्रती : शिबानी जोशी
वनवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या माध्यमातून विकास झाला, तर ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील. यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. वनवासी कल्याण आश्रम या संघटनेतर्फे १९५२ सालापासून वनवासींच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील वनवासी समाजाच्या विकासासाठी असे काही उपक्रम योजावेत, ज्यामुळे त्यांच्यात सुधारणा होऊन ते समाजाच्या मुख्य धारेत येतील, हा हेतू मनात ठेवून रायगड जिल्ह्यात पेण येथे ४ फेब्रुवारी १९९६ रोजी कातकरी वनवासीचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला रायगड व ठाणे जिल्ह्यातून कातकरी, ठाकूर, वारली, कोकणा इ. आदिम वनवासींपैकी सुमारे ७००० स्त्री-पुरुष उपस्थित होते. तत्कालीन मंत्री गोविंदराव चौधरी, भाई गिरकर असे मान्यवर नेते मेळाव्याला उपस्थित होते. या सर्वांनीच वनवासींच्या परिस्थितीविषयी चिंतन केले. हा समाज मागासलेला आहे म्हणून त्यांना शिक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे, या विचारावर यावेळी मतैक्य झाले. कार्यक्रमाला माणगावातील सुप्रतिष्ठित रहिवासी कै. गणेश रामचंद्र (गणुअण्णा) देवघर व तत्कालीन प्रांत संघटन मंत्री प्रमोद करंदीकर, सह प्रांतसचिव रमेश कोपरकर हेही उपस्थित होते. एखाद्या ठिकाणी समस्या दिसली की, त्याची उकल करण्यासाठी संघ कार्यकर्ते नेहमीच तत्परतेने हातभार लावतात. त्यानुसार मेळाव्यातील चर्चेला अनुसरून माणगावात वनवासींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करावी, असा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. शासनाने डिसेंबर १९९८ मध्ये प्राथमिक आश्रमशाळा सुरू करण्याची परवानगी दिली. प्रत्यक्षात फेब्रुवारी १९९९ पासून पहिली व दुसरीचे वर्ग सुरू करून शाळेचा प्रारंभ झाला.
सुनील सखाराम टेंबे यांच्या कारवीच्या २ खोल्या भाड्याने घेऊन एका मोठ्या शैक्षणिक प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आश्रमशाळा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची व्यवस्था व इतर प्रस्ताव प्रमोद करंदीकर, रमेश कोपरकर, राजाभाऊ काळे, संजीव कवितके, सुरेश गोखले यांनी तयार करून शाळेला सरकार मान्यता मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. गणुअण्णा देवधर, अनिल पवार, मधुकर कामत, जानू गणपत कोळी, किसन पांडू पवार, वामन काटकर, मारुती, इंदिराताई पवार आणि माणगावातील कनोजे अण्णा, श्रीधर लहाने, सुरेखा दांडेकर, डॉ. नीलिमा शिंदे, लक्ष्मण दळवी इ. सर्व कार्यकर्त्यांनी पाड्या-पाड्यांवर फिरून वनवासी विद्यार्थ्यांना शाळेत शिकायला पाठविण्यासाठी कातकरी वनवासी बांधवांच्या भेटी घेऊन राजी केले. शाळेच्या भविष्याच्या वाटचालीचा विचार करून माणगावातील दानशूर व्यक्ती महेंद्रभाई गांधी यांनी आपली ४४ गुंठे जागा शाळेसाठी उदार हस्ते दान दिली. पुढे माध्यमिक शाळेसाठी आणखी अर्धा एकर जमीन दिली. तसेच संस्थेने अर्धा एकर जमीन त्यांच्याकडून विकत घेतली. अशा तन्हेने आज एकूण दोन एकर २ गुंठे जागेमध्ये माणगाव आश्रमशाळा संकुल उभे करून त्या शाळेला त्यांच्या आईच्या स्मरणार्थ म्हणजे कै. विजया गोपाळ गांधी प्राथमिक व माध्यमिक शाळा असे नाव देण्यात आले. १५ जानेवारी २००१ वनवासी कल्याण आश्रमाचे तत्कालीन प्रांत सचिव गोविंद हरी वैशंपायन यांच्या हस्ते शाळेसाठी मिळालेल्या नवीन जागेत भूमिपूजन समारंभ होऊन शालेय इमारत आणि भोजनगृह बांधकामाची सुरुवात झाली. हे काम १० जुलै २००१ ला पूर्ण झाले.
या साऱ्या वाढत्या प्रकल्पासाठी आर्थिक चणचण भासू लागली तेव्हा वनवासी कल्याण आश्रम मुंबई महानगरचे तत्कालीन सचिव कमळाकर बेडेकर, प्रांत सहसचिव रमेश कोपरकर, जयंत अभ्यंकर, माधवराव नेने, नलूताई दामले, शैलजा ओक, शुभांगी कडगंचे आणि मुंबईच्या इतर सर्व कार्यकर्त्यांनी २००१ मध्ये माणगाव प्रकल्पाची आर्थिक जबाबदारी स्वीकारली. नवीन शालेय इमारतीत तळमजल्यावर चार आणि पहिल्या मजल्यावर चार खोल्या बांधून प्राथमिक शाळेचे पहिले ते सातवीचे वर्ग भरू लागले. शालेय इमारतीबरोबरच पाण्याच्या व्यवस्था हवीच. त्यासाठी ३२ फूट खोल विहिरीचे बांधकाम करण्यात आले. सदर विहिरीस दगड लागला पण पाणी लागले नाही; तेव्हा तिचा उपयोग पाणी साठवण्यासाठी करण्यात येऊ लागला आहे.
२८ जुलै २००२ मध्ये मुलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी रामकोटेश्वर राव यांच्या प्रयत्नातून भगवान कृष्ण गौड यांनी ८ लाखांचे अर्थसहाय्य केले. २० जुलै २००२ला मुलांच्या वसतिगृहाच्या तळमजल्याचे उद्घाटन प्रमुख अतिथी सामाजिक समरसता मंचाचे पद्मश्री दादा इदाते आणि वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्षा ठमाताई पवार यांच्या हस्ते झाले. १० मार्च २००३ भोजनगृहावरील पहिला मजला वाढविण्यासाठी राजन आठल्ये व त्यांचे बंधूंनी ५ लाखांची देणगी दिली. त्याचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते करून तेथे मुलींच्या राहण्याची सोय करण्यात आली. त्याचे कै. प्रभाकर आत्माराम आठल्ये स्मृतिभवन असे नामकरण करण्यात आले. २० फेब्रु. २००५ मध्ये मुलांच्या वसतिगृहाचे वरचे मजले वाढविण्याचे काम दातृत्ववान लोकांकडून जसजशा देणग्या येऊ लागल्या, तसतसे सुरू झाले. डॉ. विजय व त्यांचे बंधू चारुदत्त जोगळेकर यांनी ३ लाख रुपये देणगी दिली. त्यातून ज्ञानसाधना केंद्र बांधले. पहिल्या मजल्यावरील महिला अतिथीगृह व मुलांच्या २०१२-१३ मुलचंदानी यांच्या प्रयत्नाने बोअरवेलचे काम करण्यात आले. कुंदा सुळे व मधुरा वझे यांनी दुसरी बोअरवेल खणण्यासाठी अर्थसहाय्य केले. २३ ऑगस्ट २०१४ रोजी मुलींसाठीच्या वसतिगृहाच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन करण्यात आले. वसतिगृहाच्या बांधकामासाठी संत श्री गुलाबबाबा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांनी अर्थसहाय्य केले. त्याचे कै. कमलाकर भागवत छात्रावास असे नामकरण करण्यात आले.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आजारी पडल्यावर उपचारासाठी दवाखान्यात नेण्या-आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती. २००२ साली महिंद्र आणि महिंद्र कंपनीने मुंबई महानगर केंद्राला एक जीप दिली होती. तिचे हस्तांतरण २००७ साली माणगाव आश्रमशाळेला आजारी विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यास सोयीचे व्हावी म्हणून केले गेले. ती जीप ३ वर्षे वापरण्यात आली. ऑगस्ट २०१४ मध्ये हेल्थ क्वेस्ट फाऊंडेशन, मुंबई या संस्थेने आश्रमशाळेसाठी एक रुग्णवाहिका देणगीरूपाने दिली आहे. या रुग्णवाहिनीचा उपयोग शालेय आरोग्य विभागासाठी होत आहे. मुलांना केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देता यावे यासाठी संगणक कक्ष तयार करण्यात आला.
सद्यस्थितीमध्ये संगणक कक्षात १० संगणक, १० यूपीएस, ५ स्पिकर्स व २ प्रिंटर्स आहेत. यासाठी डॉ. विजय जोगळेकर यांनी अर्थसहाय्य केले. सध्या पहिली ते दहावीपर्यंत साडेचारशे मुलं इथे निवासी पद्धतीने शिक्षण घेत आहेत. शालेय पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमाबरोबरच आठवी ते दहावीतील मुलांसाठी संगणक, शेती, इलेक्ट्रिशन, वेल्डिंग आणि गृह आरोग्य याच व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिलं जातं. मुलं जेव्हा विश्वासाने एखाद्या ठिकाणी राहायला येतात, त्यावेळी त्यांच्या स्वच्छता तसेच सुरक्षेची व्यवस्था ठेवावी लागते, यासाठी संस्थेचं नाव परिसरात प्रसिद्ध आहे. याशिवाय आता अद्ययावत भोजनगृह उपलब्ध झालं असून एरोप्लेन्टही स्वच्छ पाण्यासाठी लावण्यात आला आहे. याशिवाय सर्व सण, उत्सव, महान व्यक्तींच्या पुण्यतिथी, जयंती साजरी केली जाते. विशेषतः रक्षाबंधन आणि मकर संक्रांतीचा सण तर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी उठल्यापासून योगासन, शारीरिक व्यायाम, प्रार्थना असा शिस्तबद्ध दिनक्रम विद्यार्थ्यांसाठी आखला गेला असून केवळ सुशिक्षित नाही, तर सुसंस्कारी विद्यार्थी घडावेत यासाठी प्रयत्न केले जातात. क्रीडा शाखेकडेही विशेष लक्ष दिलं जातं. ज्या मुलांना खेळाची आवड आहे, अशांसाठी विविध स्पर्धात त्या मुलांना पाठवलं जाते. खो खो, धावणे, कबड्डी तसंच धनुर्विद्येत शाळेतील मुलांनी राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त केले आहेत. एक विद्यार्थी एमएसडब्ल्यू, एक विद्यार्थी सिव्हिल इंजिनीयर्स डिप्लोमा पूर्ण करून आपल्या पायावर उभा राहिला आहे. संस्थेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असा २७ जणांचा स्टाफ आहे.
भविष्यातील योजना मुलींच्या राहण्याची अजून चांगली सोय व्हावी म्हणून वसतिगृहाचा वरचा मजला वाढवणे, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या साऱ्यांच्या संरक्षणासाठी भक्कम असे कुंपण घालणे, शाळेचे मैदान व्यवस्थित करवून घेणे इ. भविष्यकालीन योजनांची आखणी चालू आहे.