
भाजपच्या नेत्यांवर बोलाल, तर यापुढे जशास तसे उत्तर देऊ
राजापूर : देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून आजपर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहोरात्र देशासाठी काम करत आहेत. कित्येक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रसला जे जमले नाही ते मोदींनी नऊ वर्षांत करून दाखविले आहे. आत्मनिर्भर आणि लोकल्याणकारी भारत देश जगासमोर आणण्याचे काम मोदींनी केले आहे. त्यामुळे मोदींच्या कष्टांना साथ देणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हे लक्षात घ्या आणि सन २०२४ची निवडणूक जिंकण्यासाठी आणि पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम घराघरात पोहोचवा असे आवाहन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ज्यांची उभी राहण्याची लायकी नाही, अशी मंडळी त्यांच्यावर टीका करत आहेत. मात्र आपण हे मुळीच खपवून घेणार नाही. यापुढे जर का अशा प्रकारे आमच्या नेत्यांवर टीका केली तर जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.
मोदी @९ महाजनसंपर्क अभियानाचा लेखाजोखा मांडण्यासाठी राजापुरातील राजापूर हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत राणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आ. आशीष शेलार, अभियान राज्य प्रभारी आ. प्रवीण दरेकर, आ. नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार बाळ माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना राणे यांनी गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी काय योगदान दिले याचा लेखाजोखा मांडला. देशासाठी १८ तास, २० तास काम करणारे नेतृत्व आपल्याला लाभलेले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश महासतेकडे वाटचाल करत आहेत. जगात एक प्रगतशील देश म्हणून भारत नावारूपाला आला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत आपण आज पाचव्या स्थानावर आलो आहोत, पुढील काही वर्षांत आपण तिसऱ्या स्थानावर असू. आज भारताच्या पंतप्रधानांना जगात गौरविले जात आहे.
राजापुरातील ग्रीन रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणार...
राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याचे राणे यांनी सांगितले. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांसोबत आपली चर्चाही झालेली आहे. दोन लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून अनेकांना रोजगार मिळणार असून देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणारच असेही राणे यांनी सांगितले.
रमेश मोरे आणि जया जाधव यांची हत्या कुणी केली?
अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी काहीच काम केले नाही, मात्र सत्ता जाताच आत्ता हे टिका करत आहेत. नेंभळट आणि कतृव्य शून असा हा माणूस असल्याचा घणाघात करतानाच राणे यांनी रमेश मोरे आणि जया जाधव यांची हत्या कुणी आणि का केली हे उध्दव ठाकरे यांनी जाहिर करावे असे खुले आव्हान यावेळी दिले.