मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी धरपकड
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress Party) राज्यात कापूस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली असता, पोलिसांनी धरपकड केली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
जिल्ह्यातील मंजूर प्रकल्प अन्यत्र पळविले जाणे, भीषण टंचाई, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या सर्व प्रश्नांवर कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिला होता. कापसाला भाव नसल्याने निम्म्याहून अधिक कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरात आहे. कांदा उत्पादक मेटाकुटीस आला आहे. जिल्ह्यातील प्रकल्प अन्य जिल्ह्यांमध्ये पळवून लावणे, कायदा-सुव्यवस्थेसह पाणीटंचाईवर शासन गंभीर नाही. या सर्व प्रश्नांबाबत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी काळे झेंडे जप्त करून निदर्शने करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यात रोहिणी खडसे यांचाही समावेश आहे.