Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीPune Crime : दर्शनाची पुनरावृत्ती! पुन्हा एका एमपीएससीच्या तरुणीवर कोयत्याने हल्ला

Pune Crime : दर्शनाची पुनरावृत्ती! पुन्हा एका एमपीएससीच्या तरुणीवर कोयत्याने हल्ला

राज्यात घडत आहेत खळबळजनक घटना

पुणे : गेल्या काही दिवसांत राज्यात एकतर्फी प्रेमातून विकृतपणे हत्या केल्याच्या काही घटना समोर येत आहेत. यामध्ये अनेक तरुणींनाच आपला जीव गमवावा लागत आहे. मीरारोड येथील किळसवाणा हत्याप्रकार, सावित्रीबाई वसतिगृहातील हत्याप्रकार या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना (Pune Crime) समोर आली आहे. पुण्याच्या ऐन मध्यवस्तीतील सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर आज सकाळी एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. यात तरुणीचा जीव जाता जाता वाचला. मात्र दर्शना पवारचे (Darshana Pawar) हत्याप्रकरण ताजे असतानाच आणखी एक अशीच घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

संबंधित तरुणीने प्रेमाला नाकारल्याने आरोपी तरुणाचा संताप झाला आणि त्याने तरुणीवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. दिवसाढवळ्या ही तरुणी घाबरुन पळत असताना तिच्या मदतीसाठी कोणी पुढे सरसावले नाही. अखेर जमावातून एक तरुण पुढे आला व त्याने आरोपीला वार करण्यापासून परावृत्त करत तरुणीचे प्राण वाचवले. नंतर पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं व पुढील चौकशी सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर टिळक रोड येथे हा प्रकार घडला. सकाळी एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी अभ्यासिकेत जात होते. संबंधित तरुणीदेखील तिच्या एका मित्रासोबत अभ्यासिकेत जात होती. तेव्हाच एमपीएससी करणाऱ्या शांतनू जाधव या तिच्या मित्राने तिने प्रेमाला नकार दिल्यामुळे सदाशिव पेठेत कोयत्याने हल्ला केला. यामुळे घाबरलेली तरुणी जीव मुठीत घेऊन पळत सुटली. पळताना ती लोकांकडे मदतीसाठी याचनाही करत होती, मात्र घाबरलेल्या लोकांपैकी कोणीच पुढे आले नाही.

कोयता हातात असलेला तरुण तरुणीच्या डोक्यावर प्रहार करणार एवढ्यात मदतीसाठी धावून आलेल्या यशपाल जवळगे या तरुणानं कोयता धरला आणि हल्लेखोर तरुणाला रोखलं. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. उपस्थितांनी घडलेल्या धक्कादायक प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे. अचानक झालेल्या या हल्ल्याने ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

…त्याचवेळी त्यास मी पकडले : यशपाल जवळगे

संबंधित तरुणीला वाचवणारा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी यशपाल जवळगे याने सांगितले की, सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिराजवळ रस्त्याने तिला वाचवण्यासाठी मदत मागत पळत होती. तिच्या पाठीमागे आरोपी तरुण हा कोयता हातात घेऊन पळत होता. नागपूर हॉटेल जवळ सदर तरुणीवर त्याने तिच्यावर एक वार केला. त्यानंतर तरुणी पुढे पळत आल्यानंतर कॅनरा बँकेच्या चौकात तो तिच्या पाठीमागे जोरात धावू लागला आणि जवळील स्वीट मार्ट दुकानपाशी त्याने तरुणीला पकडून खाली पाडले. तो कोयता हातात घेऊन तरुणीच्या डोक्यात वार करणार होता. मात्र, त्याचवेळी त्यास मी पकडले आणि त्याला हल्ला करण्यापासून रोखले. यावेळी आणखी एक तरुण माझ्या मदतीला आला आणि त्याने आरोपी तरुणाच्या हातातील कोयता बाजूला केला. संबंधित तरुणाला पेरुगेट पोलीस चौकीत पोलिसांकडे आम्ही स्वाधीन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -