
रायपूर : छत्तीसगडमधील प्रसिद्ध कॉमेडी यूट्यूबर देवराज पटेल (Youtuber Devraj Patel) याचा रस्ते अपघातात (Accident ) मृत्यू झाल्याने त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. (Dil Se Bura Lagta Hai)
भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने देवराज पटेलच्या दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये देवराज पटेलचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रायपूरच्या तेलीबंधा पोलीस ठाणे परिसरात सोमवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
देवराज पटलने त्याच्या व्हिडिओंसाठी 'दिल से बुरा लगता है' ही पंच लाईन वापरली. देवराज पटेल याने मृत्यूच्या चार तास आधी एक व्हिडीओ बनवून पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये त्याने सर्वांना अलविदा असे म्हटले आहे. देवराज पटेलने २०२१ मध्ये प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम सोबत कॉमेडी वेब सिरीज धिंडोरा मध्ये काम केले होते. देवराज याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले आहे.
देवराजची अकाली 'एक्झिट' ही मनाला चटका लावणारी आहे. देवराजच्या निधनावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देवराजचा एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. यामध्ये देवराज पटेल हा छत्तीगड मध्ये दोनच लोक फेमस आहेत, एक मी आणि एक म्हणजे आमचे काका असे म्हणताना दिसत आहे.
मृत्यूच्या काही तास आधीच देवराज पटेलने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला होता. मिळालेल्या माहितीनुसार देवराज पटेल हा रील शूट करण्यासाठी नवे रायपूर येथे आला होता. परतीच्या प्रवासाच्या वेळी हा अपघात घडला. देवराज हा अवघ्या २१ वर्षाचा होता. सध्या तो बीएच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता.