
महापालिका कर्मचारी मारहाण प्रकरण भोवले
मुंबई : महानगरपालिका कर्मचारी मारहाण प्रकरणी आमदार अनिल परबांसह (MLA Anil Parab) २५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक केली आहे.
महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील असिस्टंट इंजिनियर पाटील यांना काल ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. याप्रकरणी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि विभाग प्रमुख अॅड. अनिल परब (Anil Parab) यांच्यासह २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर वाकोला पोलिसांनी माजी नगरसेवक सदा परब, माजी नगरसेवक हाजी हलीम खान, शाखाप्रमुख संतोष कदम आणि शाखाप्रमुख उदय दळवी या चार जणांना अटक केली आहे. याप्रकरणी अन्य फरार असलेल्या आरोपींचा वाकोला पोलीस शोध घेत आहेत.
वाकोला पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करुन फरार आरोपींची धरपकड सुरू केली आहे. या मारहाणीनंतर वाकोला पोलिसांनी १३ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, सीसीटिव्ही कॅमेरे तपासल्यानंतर यातील काही जणांना सोडून देण्यात आले आहे.