Sunday, May 11, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

World Cup 2023: काऊंट डाऊन सुरु... भारतात विश्वचषकाचा थरार 'या' दिवशीपासून

World Cup 2023: काऊंट डाऊन सुरु... भारतात विश्वचषकाचा थरार 'या' दिवशीपासून

मुंबईत उद्या वेळापत्रक होणार जाहीर


नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला (World cup 2023 in India) ४ महिन्यांपेक्षा कमी अवधी शिल्लक राहिला आहे. पण बीसीसीआय (BCCI) अथवा आयसीसीने (ICC) अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही. विश्वचषकाच्या थराराला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पण वेळापत्रकाचा पत्ता नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनलवेळी बीसीसीआयने विश्वचषकाचे वेळापत्रक आयीसीला पाठवले. पाकिस्तान संघाने खोडा घातल्यामुळे वेळापत्रकाला उशीर झाला आहे. पण आता प्रतिक्षा संपणार आहे. कारण दोन दिवसात विश्वचषकाचे वेळापत्रक (World Cup Shedule) जाहीर होणार. उद्या मंगळवारी २७ जून रोजी आयसीसी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. मुंबईत मोठ्या कार्यक्रमाद्वारे आगामी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तेव्हापासून विश्वचषकाला १०० दिवसांचा कालावधी शिल्लक राहणार आहे.


पाकिस्तानने खोडा घातल्यामुळे वेळापत्रकाला उशीर झाला होता. ठिकाण आणि सराव सामन्यावरुन बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून नाट्य सुरु होते. पाकिस्तान आणि भारत या दोन देशात असलेल्या वादाचा परिणाम वेळापत्रकावर झाला होता. भारत, पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जात नाही. त्यामुळे पाकिस्ताननेही भारतात क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. पण आता पाकिस्तानच्या या नाट्याला पूर्णविराम मिळणार आहे.


‘भारतात विश्वचषक खेळायला जायचे की नाही, याबाबत आमच्या सरकारकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे आयसीसीला वेळापत्रकाबाबत अद्याप सहमती दर्शवलेली नाही. आमच्या सरकारने भारतात जायची परवानगी दिल्यानंतरच याबाबत आम्ही निर्णय घेऊ’, असे पीसीबीचे माजी चेअरमन नजीम सेठी यांनी सांगितले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील हाय होल्टेज सामना आयोजित करण्यात आला आहे, यावरच पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. अहमदाबादमध्ये पाकिस्तानला सुरक्षित वाटत नाही, त्यामुळे अद्याप त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. अहमदाबाद येथे होणारा सामना चेन्नईला होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलियाविरोधात बंगळुरू आणि अफगाणिस्तानविरोधात चेन्नईमध्ये खेळण्यासही पाकिस्तान तयार नाही. बीसीसीआयने या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही आणि पाकिस्तानची विनंती फेटाळली.दरम्यान, बंगळुरूचे मैदान लहान आहे, तर चेन्नईची खेळपट्टी फिरकीला पोषक आहे. त्यामुळेच कदाचीत पाकिस्तानने येथे खेळण्यास नकार दिला, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे.


बीसीसीआयने विश्वचषकाच्या वेळापत्रकाचा ड्राफ्ट आयसीसी आणि सहभागी होणाऱ्या देशांना पाठवाला असून त्यानुसार, याअधीचा विश्वविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्या सामन्याने विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. हा सामना चेपॉकवर होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचे नऊ सामने वेगवेगळ्या मैदानांवर होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर आयोजित करण्यात आला.

Comments
Add Comment