
जखमींमध्ये माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांचे पती किशोर पाटील यांचा समावेश
मुरूड : मुरुड विहूर मार्गावर राजवाड्याजवळील बाह्य वळणावर एक ऑटो रिक्षा आणि वॅगनर गाडीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात (accident) ऑटो रिक्षा चालकासह अन्य दोघे जण जबर जखमी झाले आहेत.
जखमींना मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांचे पती किशोर पाटील यांच्यासह रिक्षाचालक व अन्य एक प्रवासी यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथे हलविण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी हा अपघात झाला.
ऑटो रिक्षा एम एच ०६ झेड ३७८९ ही मुरुडच्या दिशेने जात असताना व एम एच ०२ बी टी ९९१८ क्रमांकाच्या वॅगनर गाडीने विहूर दिशेने जात असताना राजवाड्याजवळील बाह्य वळणावर भरधाव वेगाने येणाऱ्या वॅगनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. यावेळी जोरदार पाऊस पडत होता. वळणावर दोन्ही चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे सदरचा अपघात झाला. जखमींवर मुरुडच्या फातिमा बेगम ग्रामीण रुग्णालयात त्वरित उपचार करण्यात आले व पुढील उपचारासाठी अलिबाग येथे हलविण्यात आले आहे.