Pandharichi wari : वारी… एक राष्ट्रीय मेळा

Share
  • सचिन पवार : अभ्यासक

‘वारी’ हे एक आनंदनिधान आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरील बदलांच्या क्षमता ‘वारी’मध्ये आहेत. सुमारे एक हजार वर्षे जुनी असणारी ‘वारी’ ज्ञानोबा-तुकाराम या विचार-परंपरेने बळकट केली. ‘वारी’च्या माध्यमातून समाजकल्याणाची वहिवाट घालून दिली. या विचार-परंपरेचा कालसुसंगत अर्थ कळला, तर आपला प्रवास अधिक सुखाचा होईल, यात शंका नाही.

एखादा धर्मसंप्रदाय केवळ उपासनेपुरता, पूजा पद्धतीपुरता मर्यादित न राहता तत्त्व आणि विचारांसह सर्वसामान्य माणसांमध्ये झिरपतो आणि समाजाच्या वागण्या-बोलण्यातून दिसू लागतो तेव्हा त्याला परिपूर्णत: येते. महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय यांचा संबंध हा असाच आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जात-धर्म-पंथाच्या व्यक्तीला वारकरी संप्रदायाविषयी आस्था नसणे शक्यच नाही. देव न मानणारेदेखील ‘वारी’ आणि वारकरी संप्रदायाचे योगदान नाकारू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या सर्वांसाठी दर वर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होणारी ‘वारी’ आणि आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा हा अनुभवण्याबरोबरच अभ्यासण्याजोगी बाब आहे. केवळ राज्य वा देशातीलच नव्हे, तर परदेशातील लोकही वारीविषयी जाणून घेण्यास, त्यात सहभागी होण्यास आणि या भक्तिरसाचा एक भाग होण्यास आता उत्सुक असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून आजपर्यंत महाराष्ट्रात महानुभाव, जैन, शाक्त इत्यादी पंथ आणि परंपरेचे लोक होते आणि आहेत. पण या सर्वांच्या तुलनेने मराठी जनमानसात वारकरी संतांचा विचार जास्त मुरला. महानुभावाच्या विचारांना काठिण्य आहे. असे असते तिथे बोजडपणा आला. वीरशैवांचा विचार महाराष्ट्र काबीज करू शकला नाही. असे असताना वारकरी परंपरेला इतका पाठिंबा का मिळाला, याचा विचार केला असता वारकरी संतांचे सर्वसमावेशक तत्त्वज्ञान आणि या तत्त्वज्ञानाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारी विचार वितरण व्यवस्था हे दोन्ही भक्कम असल्याने वारकरी संप्रदायाला इतका लोकपाठिंबा मिळाला असावा, असे म्हणता येते.

सर्वच वारकरी संतांनी कुळ जात अप्रमाण मानले. शाव, नाथ, आनंद, चैतन्य, प्रकाश इत्यादी पंथांच्या विचारधारा वारकरी तत्त्वज्ञानात बेमालुमपणे मिसळून एकरूप झाल्या. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ असा वारकरी संतांचा व्यापक विचार होता. या सर्वसमावेशक विचारातच वारकरी संप्रदायाच्या यशाची बीजे आहेत. पण निव्वळ विचार चांगला असून जमत नाही तर तो लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचायला हवा, तसेच त्यातूनही त्या विचारांचे अनुयायी निर्माण व्हायला हवेत. विचार चांगला असला मात्र त्याला व्यापक लोकसंग्रहाची जोड नसेल तर अल्पायुषी ठरतो. कधी कधी आपण दुबळा विचार असणाऱ्या चळवळीही व्यापक लोकपाठिंब्यामुळे तग धरून राहिलेल्या पाहतो. म्हणजेच विचार महत्त्वाचा तितकाच तो कोणत्या पद्धतीने समाजापर्यंत पोहोचतो, तेही महत्त्वाचे आहे.

या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व स्तरांपर्यंत वारकरी विचार पोहोचावा यासाठी संतांनी दोन पद्धती वापरल्या. पहिली पद्धत म्हणजे त्यांनी स्वत: विकसित केलेली जनसंवादाची माध्यमे. यामध्ये भजन, कीर्तन, भारूड, प्रवचन इत्यादींचा समावेश होता. दुसरी पद्धत म्हणजे पंढरीची वारी. या दोन प्रभावी साधनांच्या प्रभावी वापरामुळे वारकरी विचार उत्तम पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आजही महाराष्ट्रावर भजन, कीर्तनांचा पगडा आहे. कोणत्याही गावात आजही व्याख्यांनापेक्षा कीर्तन-प्रवचनाला जास्त गर्दी होते. नारदीय कीर्तन परंपरा पेठांमधील मठामंदिरात अडकून पडली पण वारकरी सांप्रदायिक कीर्तनांचे महाराष्ट्रावर ‘गारूड’ आहे हे खरे. यासोबतच पंढरीची पायी वारीदेखील हे विचार पोहोचवण्याचे महत्त्वाचे साधन आहे. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणारे सैन्याचे संचलन किंवा स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील प्रभात फेऱ्या यांच्या माध्यमातून आपल्या संघटनेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. अशाच प्रकारे वारीच्या माध्यमातून वारकरी विचार, तत्त्वज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. म्हणूनच पंढरीची वारी ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी, सर्वात मोठी, सर्वात जास्त दिवस चालणारी विचार यात्रा आहे.

वारी हा वारकऱ्यांचा कूळ धर्म आहे. महाराष्ट्राची महाउपासना आहे. तिला विवेकाचे अधिष्ठान आहे. विवेकाचा गाभा हरवला की कोणत्याही उपासनेमागील विचाराचा आत्मा मरून जातो आणि निव्वळ कर्मकांड शिल्लक राहते. माणूसपणाच्या मर्यादांसह गाथा ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान जगू पाहणाऱ्या लोकांचा मेळावा म्हणजे वारी. वारी ही एक धार्मिक कृती असली तरी त्यामध्ये कोणतीही बुवाबाजी, गुरुबाजी, भपकेबाजी यांचे स्तोम नाही. कोणी तसा प्रयत्न केला तर शहाणे वारकरी अलगद बाजूला काढतात. वारीत आणि वारकरी संप्रदायात कोणालाही धर्माच्या नावाने शोषण करण्याची संधीच नाही, कारण संतांनी तशी मेखच मारून ठेवली आहे. गाथा ज्ञानेश्वरीच्या चौकटीत कोणत्याही वारकरी कीर्तनकार, फडकरी, गुरूच्या वर्तनाची चौकशी करण्याचा अधिकार सामान्यातील सामान्य वारकऱ्याला आहे. वारकरी संप्रदायात नेतृत्व करणाऱ्यावर संतविचारांचा असा सकारात्मक दबाव आहे. कोणत्याही साध्या माणसाने विचारप्रवृत्त होण्यासाठी भरपूर प्रवास केला पाहिजे तसेच विद्वानांशी मैत्री केली पाहिजे असे सुभाषितकारांनी सांगितले आहे. पंढरीच्या वारीच्या वाटेवर संतसज्जनांची संगत मिळते आणि भजन, कीर्तनाच्या माध्यमातून संतविचार अंत:करणात पाझरतो. संतांचा विचार आणि त्या विचाराने प्रभावित होऊन कृती करणारे वारकरी वारीच्या वाटेवर भेटतात. विचार आणि कृती यांचे एकमेकांसोबत हातात हात घालून चालणे दिसते. अखंड १८ दिवस अभंगांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर अभंगांचेच गायन, श्रवण, चिंतन केल्यानंतर माणसाच्या बदलाची प्रक्रिया निश्चितच सुरू होत असेल. कोणत्याही विचाराने वारीत या, वारीचा आत्मा कळाला की, पंढरपूरला गेल्यावर ‘तुझा विसर न व्हावा’ हेच मागणे शिल्लक राहाते. वारीमागचा हा विचार समजला नाही, तर आपण वारकरी होण्याऐवजी फक्त ‘बघे’ होतो.

महाराष्ट्र संस्कृती, मराठी माणूस आणि मराठी भाषा यासंबधी गांभीर्याने विचार करणाऱ्या कोणालाही वारीकडे डोळेझाक करता आलेली नाही. महाराष्ट्र उभा राहण्यात आणि भविष्यात योग्य दिशेने चालण्यासाठी वारीचे योगदान महत्त्वपूर्ण असणार आहे. जगभरातील सर्व समाजात समता प्रस्थापित करणे हे एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे जगप्रसिद्ध लेखक युनान हरारी यांनी आपल्या नव्या पुस्तकात नोंदवले आहे. ज्ञानोबा-तुकाराम हे संत महाराष्ट्रातील समतेच्या लढाईचे पहिल्या फळीचे शिलेदार होते. त्यांचे विचारसंचित घेऊन समाजसुधारकांनी ही समतेची लढाई पुढे नेली. ती पुढे जाण्यासाठी या ‘समता संगराला वारीचे सामर्थ्य लाभावे’ ही अपेक्षा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी व्यक्त करून ठेवली आहे. धर्माची विवेकी चिकित्सा करणारे, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ महाराष्ट्रात रुजवणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर वारीची क्षमता ओळखून होते. वारकरी विचारांचा पाया क्रांतिकारी असून त्याच्या तत्त्वज्ञानाची मांडणी जातीअंताच्या दिशेने जाणारी आहे. आचार, विचार आणि उच्चार यातील शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा याचे प्रतीक म्हणून डॉ. दाभोलकर वारकऱ्यांकडे पाहतात आणि वारकऱ्यांकडून सामाजिक मन्वंतर घडवून आणण्याची रास्त अपेक्षाही करतात.

वारी, वारकरी संप्रदाय यांचे महत्त्व ओळखून असणारे राजारामशास्त्री भागवत हे आणखी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. वारकरी संप्रदाय हा मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह असून गाथा, ज्ञानेश्वरी हे मराठ्यांचे आगम आणि आळंदी, देहू, पंढरपूर ही त्रिस्थळी असल्याचे शास्त्रीजींनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी सांगितले आहे. १८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी राष्ट्रजागृतीच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या पार्श्वभूमीवर राजारामशास्त्रींनी ‘ज्ञानोबाची पालखी’ या शीर्षकाचा लेख लिहिला. पंढरीच्या वारीसारखा जुना राष्ट्रीय मेळा जागता असताना सार्वजनिक गणेशोत्सवासारख्या नव्या राष्ट्रीय मेळ्याची आवश्यकता नाही, असे सांगत शास्त्रीजींनी पंढरीच्या वारीच्या राष्ट्रजागृतीच्या क्षमता स्पष्ट केल्या आहेत. वारकरी नसणाऱ्या पण वारीचे महत्त्व ओळखणाऱ्या राजारामशास्त्री आणि डॉ. दाभोलकर यांच्या साक्षी या अानुषंगाने पुरेशा आहेत. थोडक्यात, व्यक्तिगत आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरील बदलांच्या क्षमता वारीमध्ये आहेत. सुमारे एक हजार वर्षे जुनी असणारी वारी ज्ञानोबा-तुकाराम या विचार-परंपरेने बळकट केली. वारीच्या माध्यमातून तिने समाजकल्याणाची वहिवाट घालून दिली. आज या विचार-परंपरेचा कालसुसंगत अर्थ कळला, तर आपला प्रवास अधिक सुखाचा होईल, यात शंका नाही.

(लेखक वारकरी कीर्तनकार आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Nitesh Rane : गुजरातच्या बसवर टीका करणारा मविआचा नेता अदानींचा खास ड्रायव्हर!

आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…

23 mins ago

Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील भोलेबाबाचा गलिच्छ प्रकार उघडकीस!

भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…

53 mins ago

Pune Crime : पैसे परत न केल्याने शिक्षित डॉक्टरने कोयता हाती घेत केला तरुणाचा खून!

गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…

2 hours ago

Pune porsche accident : अखेर धनिकपुत्राने लिहिला ३०० शब्दांचा निबंध!

बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…

3 hours ago

Accident News : भीषण अपघात! मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर तीन वाहनांची जोरदार धडक

तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक…

3 hours ago

Britain government : ब्रिटनमध्ये सत्ताबदल! ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव

आता 'हे' असणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) काल म्हणजेच ४ जुलै रोजी…

4 hours ago