
आषाढी एकादशीनिमित्त वारीमध्ये विठूमाऊलीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी तहानभूक विसरून सहभागी होतात. मात्र कामाच्या व्यापात अडकलेल्या अनेक लोकांना इच्छा असूनही वारी करता येत नाही. तरीही आपापल्या परीने ते विठ्ठलाची भक्ती करत असतात. कधी कुणी दानधर्म करतं तर कधी वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी या माध्यमांतून जनजागृती केली जाते. असाच एक आगळावेगळा उपक्रम तन्वी गुंडये हिने हाती घेतला आहे, ज्याला नावही तितकंच समर्पक दिलं आहे. हा उपक्रम म्हणजे 'कलावारी'!
कलावारी उपक्रमाची तन्वीने गेल्या वर्षीपासून सुरुवात केली. या उपक्रमात ती दरदिवशी एक अभंग व सोबत विठोबाची कलाकृती साकारते. यावर्षी तिने ९ जूनपासून कलावारीची सुरुवात केली. पाहूयात या कलावारीची आतापर्यंतची झलक...
ज्येष्ठ कृष्ण षष्ठीदिवशी काढलेले हे पहिले चित्र.
संत ज्ञानेश्वरांच्या अभंगासोबत काढलेले हे दुसरे चित्र.
प्रत्येक चित्राला वेगवेगळ्या अभंगाची जोड देत तन्वीने कलावारी साकारली आहे. त्यातील हे तिसरे चित्र.
संत सावता माळी यांच्या अभंगासाठी तन्वीने विठ्ठलाच्या चेहर्यासोबत पानाफुलांची नक्षी रेखाटलेले हे कलावारीतील चौथे चित्र.
जनीच्या मदतीसाठी विठ्ठलच धावून आला आहे, अशी कल्पना करत हे पाचवं चित्र रेखाटलं आहे.
योगिनी एकादशीदिवशी काढलेले हे सहावे चित्र.
विठ्ठलाचे वर्णन करणार्या संत नामदेवांच्या अभंगासोबत हे सातवे चित्र.
मधुबानी चित्रशैलीतील हे आठवे चित्र.
रेघोट्यांचा वापर करत संत सोपानदेवांच्या अभंगासोबत काढलेले हे नववे चित्र.
शून्यातून साकारलेले हे विठ्ठलाचे दहावे चित्र.
विठ्ठलाच्या चरणस्पर्शाची आस लागलेल्या वारकर्याचे हे अकरावे चित्र.
संत चोखामेळांच्या कल्पनेप्रमाणे नाचणार्या पांडुरंगाचे हे बारावे चित्र.
तेराव्या चित्रात विठ्ठलासोबत रुक्मिणी देखील आहे.
स्क्रॅचिंग तंत्राचा (Scratching Technique) वापर करत काढलेले हे चौदावे चित्र.
विठ्ठलाच्या कानातील मासळी सुटून पाण्यात पोहत आहे आणि विठ्ठल तिच्याकडे कौतुकाने पाहत आहे, अशी कल्पना करत काढलेले हे पंधरावे चित्र.
केवळ उभ्या रेघोट्यांचा वापर करत काढलेले हे सोळावे चित्र.
सतराव्या चित्रात बाळ विठ्ठल रेखाटला आहे.
वारली शैलीतील वारकरी, विठ्ठलाच्या कपाळावरील नाम, त्याच्या कानांजवळील मासोळ्या आणि त्याचा डोळा एकत्रपणे बांधत काढलेले हे अठरावे चित्र.
आपल्या या उपक्रमाबद्दल तन्वी सांगते, "मला चित्रकलेची खूप आवड असली तरी कधीकधी इतर कामांमुळे त्यासाठी वेळ देता येत नाही. आषाढी वारीच्या निमित्ताने मी कलावारीसाठी स्वतःला आव्हान देत ठरवून वेळ काढते आणि विठ्ठलाची चित्रे साकारते. यातून रोज विठ्ठलाचं स्मरणही होतं आणि माझी आवडही जोपासली जाते."
यानंतरही पुढील दोन दिवस म्हणजेच आषाढी वारीपर्यंत ही कलावारी सुरु ठेवण्याचा तन्वीचा मानस आहे. कलावारीची यापुढील चित्रे तुम्ही तन्वीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहू शकता.
https://instagram.com/tanvi.gundaye?igshid=MzRlODBiNWFlZA==