
यावेळेला नेमके काय अपडेट?
मुंबई : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या पावसाने अखेरीस परवापासून मुंबईत हजेरी लावली. हवामान विभागाने (Weather Department) २९ जूनपर्यंत मान्सून (Monsoon) संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र मान्सून दाखल होण्याचे निकष त्याआधीच पूर्ण झाल्यास हवामान विभागाकडून मान्सून सक्रिय झाल्याची घोषणा होणार होती. अखेरीस मान्सूनने आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) केली आहे. याआधी २०१९ मध्ये २५ जून रोजी मान्सून दाखल झाला होता व तो आतापर्यंतचा सर्वात उशिरा दाखल झालेला मान्सून होता.
मान्सूनने आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. या राज्यांमध्ये पुढील दोन दिवसांत मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे.
दिल्लीत मान्सूनचे लवकर आगमन
मुंबईत (Mumbai) दरवर्षी साधारण ११ जून रोजी मान्सून दाखल होतो पण यावेळेस त्याने १४ दिवस उशीर केला. याउलट दिल्लीमध्ये (Delhi) २७ जून रोजी मान्सून दाखल होतो तर यावेळेस तो दोन दिवस आधीच दाखल झाला. यामुळे मुंबई आणि दिल्लीत मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) करण्यात आली आहे.
मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
मुंबईत अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, लालबाग, परळ, भायखळा, विलेपार्ले या परिसरात जोरदार पाऊस पडला. नवी मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसाने हजेरी लावली. कळवा आणि मुंब्र्यातही पावसाची संततधार सुरु होती. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर भागात पावसाने हजेरी लावली तर कल्याण डोंबिवलीतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
पुण्यातल्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असून सिंहगड रोड, कात्रज, कोंडवा आणि कार्जेमध्ये रिमझिम पाऊस कोसळला. कोल्हापुरसह ग्रामीण भागातही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, रोडा, कणकवली, मालवण तालुक्यातही पाऊस पडला. त्याचबरोबर राज्यातील वाशिम, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पालघर, वसई विरार या भागात पावसानं जोरदार हजेरी लावली.
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई
मुंबईत पहिल्याच पावसात काही ठिकाणी पाणी साचलं. यामुळे कालच्या दिवसांत कामाला जाणा-यांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.