
पंढरपूर (वृत्तसंस्था) : ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज कि जय’ च्या जयघोषाने खुडूस (Khudus) येथील माउलींचे रिंगण (Ringan) पार पडले. यावेळी अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साह संचारलेला दिसला. दुसरीकडे तुकोबारायांच्या पालखीचे माळीनगर (Malinagar) येथे उभे रिंगण संपन्न झाले. दरम्यान, सोमवारी माउलींची आणि सोपानदेव यांची बंधुभेट होऊन पालखी भंडीशेगाव येथे मुक्कमी असणार आहे. तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रवेश पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे राहणार आहे. आता भाविकांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची (Vitthal Darshan) आस लागली आहे.
माउलींची पालखी माळशिरस येथून प्रस्थान ठेवून खुडूस फाटा येथे रविवारी सकाळी पोहोचली. येथील मैदानावर माउलीच्या पालखीचे दुसरे रिंगण संपन्न झाले. भव्य मैदानावर गोलाकार भाविकांची गर्दी दिसून आली. हातात भगवी पताका, टाळ मृदुंगाचा , हरीनामाचा जयघोष आणि रिंगण सोहळा पाहण्याची उत्सुकता भाविकांना लागली होती. रिंगणाच्या ठिकाणी माउलीची पालखी विराजमान झाली. त्यानंतर माउलींचे अश्व आले. चोपदाराने इशारा करताच उपस्थित भाविकांनी ‘बोला पुंडली वरदे’चा जयघोष केला. टाळ - मृदुंग आणि ‘माउली माउली’ च्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला आणि अश्वाने गोल फेरी पूर्ण केली. त्यानंतर पालखी सोहळा वेळापूर येथे विसावला. माउलीची पालखी सोमवारी वेळापूर येथून प्रस्थान ठेवून ठाकुरबुवा समाधी येथे तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे संत सोपानदेव यांची बंधुभेट करून भंडीशेगाव येथे मुक्कमी असणार आहे.
तर दुसरीकडे जगद्गुरू तुकारम महारज यांच्या पालखीने अकलूज येथून प्रस्थान ठेवले आणि पालखी माळीनगर येथे पोहोचली. या ठिकाणी उभे रिंगण पार पडले. तुकोबारायाचा नगारखाना त्यानंतर पालखी आणि पाठोपाठ अश्व आले. दुतर्फा भाविकांनी रांगा लावल्या होत्या. विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात अश्वाने उभी दौड पूर्ण करून पालखीला नमस्कार करून रिंगण सोहळा संपन्न झाला. या नंतर विविध खेळ खेळून भाविकांनी मनमुराद आनद घेतला. या नंतर पालखी बोरगाव येथे मुक्कमी पोहचली. आज पालखी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करून पिराची कुरोली येथे मुक्कमी असणार आहे.