मॉस्को (वृत्तसंस्था): गेल्या दोन दिवसांपासून रशियामध्ये (Russia) वॅग्नर (Wagner) या समांतर सैन्यगटानं पुतिन (Putin) यांच्याचविरोधात बंड केलं होतं. मात्र, अखेर दोन्ही बाजूंनी झालेल्या वाटाघाटींनंतर वॅग्नर नरमले असून रशियातील संभाव्य विध्वंस टळला आहे. वॅग्नर ग्रुपचा प्रमुख येवगेनी प्रिगोझिन आणि रशियाच्या बाजूने वाटाघाटी करणारे बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांड ल्युकाशेंको यांच्यातील चर्चा यशस्वी ठरली आहे. ही चर्चा पूर्ण होताच प्रिगोझिननं मॉस्कोच्या दिशेनं आगेकूच करणाऱ्या आपल्या सैन्याला थांबण्याचे आदेश दिले आहेत.
या चर्चेनुसार प्रिगोझिनवर कोणताही खटला चालवला जाणार नसून त्याला बेलारूसला विनाअडथळा पाठवण्यास व्लादिमीर पुतिन तयार झाले आहेत. ही चर्चा होण्याआधी प्रिगोझिनचा वॅग्नर ग्रुप थेट रशियाची राजधानी मॉस्कोच्या अवघ्या २०० किलोमीटरहून कमी अंतरावर पोहोचला होता. ही चर्चा यशस्वी झाली नसती, तर आत्तापर्यंत वॅग्नर ग्रुप मॉस्कोमध्ये घुसला असता. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन रशियन सैन्यानंही मॉस्कोमध्ये तयारी केली होती. रशियन सैन्य वॅग्नर ग्रुपचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आलं होतं. मात्र, ही चर्चा यशस्वी ठरल्यामुळे प्रिगोझिननं वॅग्नर ग्रुपला मॉस्कोमध्ये घुसण्याच्या आधीच थांबण्याचे आदेश दिले आहेत.
प्रिगोझिनला सोडलं कारण….
दरम्यान, प्रिगोझिन आणि त्याच्या वॅग्नर ग्रुपनं गेल्या दोन दिवसांपासून रशियामध्ये घातलेल्या धुमाकुळानंतर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं खुद्द पुतिन यांनीच जाहीर केलं होतं. मात्र, माघार घेण्याचा निर्णय प्रिगोझिननं जाहीर करताच पुतिन यांनी आपली भूमिका बदलली आहे. प्रिगोझिनला विनाआडकाठी बेलारूसला जाऊ देण्यास पुतिन तयार झाले असून त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असंही पुतिन यांनी जाहीर केलं आहे. “रशियामध्ये रक्तपात आणि अंतर्गत लढा होऊ नये हेच सर्वोच्च ध्येय होतं. म्हणून त्यांनी प्रिगोझिन आणि त्याच्या सैन्याला जाऊ दिलं”, असं स्पष्टीकरण पुतिन सरकारकडून देण्यात आलं आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra