बंगळूरू: वरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी महाराष्ट्रात (Maharashtra) बेडकाचे लग्न लावले जाते. मात्र कर्नाटकातील (Karnataka) मंड्या जिल्ह्यात गंगेनहल्ली गावात भगवान इंद्राला प्रसन्न करण्यासाठी चक्क दोन मुलांचे लग्न लावण्यात आले. एक मुलगा वर आणि दुसरा वधू बनला. वधुने साडी, चोळी असा पारंपरिक वेश केला तर नवरदेवही छान पापंरपरिक कपड्यात तयार झाला होता. इतकचं नव्हे तर विवाह सोहळ्यात संपूर्ण गावाला मेजवानीही देण्यात आली.
खरंतर, हे सर्व काहीसे प्रतीकात्मक होते. पावसासाठी गावकऱ्यांनी लग्न आणि मेजवानीची जुनी परंपरा या निमित्ताने साजरी केली. गावात चांगला पाऊस व्हावा यासाठीच हे सर्व काही करण्यात आल्याचे गंगेनहल्ली गावातील लोकांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्नाटकात कमी पाऊस झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
भारतात ही जुनी परंपरा
कर्नाटकच्या ग्रामीण भागात पावसासाठी दोन तरुणांमध्ये लग्न करण्याची परंपरा फार जुनी आहे. बंगळुरूमध्ये २०१७ मध्ये असाच एक प्रतीकात्मक विवाह झाला होता. लोकांचा असा विश्वास आहे की या प्रकारच्या लग्नामुळे गावातील लोक सुखी आणि समृद्ध होतात.
२०१७ मध्ये मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यानंतर इंदूरच्या मुसाखेडी येथेही अशाचप्रकार दोन तरुणांचे लग्न लावून देण्यात आले होते. दोन्ही मुलांसाठी मंडप सजवण्यात आला आणि दोघांनी सप्तपदी घेतली. त्यात दोन्ही बाजूंनी स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते.