- मुक्तहस्त : अश्विनी पारकर
मंथमची पावलं घराच्या दिशेने वायुवेगाने पळत होती. उद्या होता खरं तर रविवार. पण याचा अन् मंथमच्या पळणाऱ्या पावलांचा काडीचाही संबंध नव्हता. शनिवार असो अथवा आठवड्याचे इतर दिवस, मंथमच्या पावलं घराच्या दिशेने नेहमी थबकत थबकतच आपला रस्ता पूर्ण करत. पण आजचा दिवसच होता मुळी खास, कारण अशी गंमत घडलीच नव्हती, यापूर्वी.
महिन्याचा शेवटचा शनिवार होता. अर्थात शाळेतल्या मुलांसाठी अर्धा दिवस अन् शिक्षक आणि पालकांसाठी महिन्याची पालकसभा. शेवटच्या तासाची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोचला. चौथी ‘अ’च्या वर्गशिक्षिका मालतीबाई आज गैरहजर होत्या. त्यामुळे वर्गाला जत्रेचे स्वरूप आले होते. मुलींनी गाण्याच्या भेंड्या सुरू केलेल्या, तर मुलांचा आवडता क्रीडाप्रकार ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’ एन रंगात आलेला. मध्ये मध्ये कागदाचे बोळे, कागदी विमाने, तुटलेले खडू इकडून तिकडून भिरकावले जात होते. इथे बाई अनुपस्थित म्हणून मुलं आनंदात मात्र पालक चिंतेत वर्गाबाहेर ताटकळत उभे होते.
या सर्व गोंधळात एक आवाज वारा कराकरा कापत वर्गातील शेवटच्या बाकापर्यंत पोहोचला. वर्गात बाई नसताना नेमकी कुणी या आवाजात अशी एन्ट्री केली हे पाहण्यासाठी सर्व बालगोपाळांनी ३६० अंशाच्या कोनात आपल्या माना वर्गातील काळ्या फलकाकडे वळवल्या. समोर पाहतात तर काय? तावातावाने वांग्याच्या भाजीच्या रंगाच्या साडीतील एका मोठ्ठा आंबाडा घातलेल्या बाईंनी एन्ट्री घेतली होती. त्यांचे ते वटारलेले डोळे पाहून अनेकांना त्यांची आवडती भाजी अर्थात बटाटा आठवला. त्या दोन बटाट्यांच्या मध्ये लावलेलं ठसठशीत कुंकू पाहून मंथमला काही क्षणांतच त्या बाईंची ओळख पटली. हीच ती आपली डेंजर डॉन अम्मा.
तसं म्हणायला गेलं तर, मंथमला या वटारलेल्या बटाट्यांची अन् सतत वाजणाऱ्या भोंग्याची सवयच होती. तो पहिलीत असताना त्याची अम्मा गेली. त्यानंतर मंथमच्या वडिलांनी दुसरं लग्न करत मुलाप्रती आपली जबाबदारी नव्या आईवर सोपावलेली. त्यांचा जास्त काळ प्रवासातच जाई, कारण त्यांची नोकरी फिरतीची होती. इथे त्यांच्या अनुपस्थितीत मंथमच्या सावत्र अम्माची करडी नजर मंथमवर असे. सावत्र अम्मा एकदम कडक शिस्तीची पण त्यात दुजाभाव असे. नारळ वरून जरी टणक असला तरी आत रसदार खोबऱ्याची गोड चव असते. मायेचं थंडगार पाणी असतं. पण मंथमच्या नशिबी या दोन्ही गोष्टी नव्हत्या. त्याच्या नशिबी होती ती नारळाच्या झाडांपासून तयार केलेली केरसुणी अन् त्याचे घाव. रसदार खोबऱ्याचं वात्सल्य अन् मायेचं पाणी होतं फक्त त्याच्या धाकट्या भावाच्या नशिबी, कारण तो तिचा सख्खा मुलगा होता नं. घरात गुळासोबत खोबऱ्याचं सारणं घालून केलेले गोड घावणे बनत. मंथमला ते फार आवडायचे, पण त्याचा पहिला अन् मोठा वाटा धाकट्या भावाच्या ताटात अन् मग उरलंसुरलेलं मंथमला.
मंथमच्या आयुष्यात मायेचा ओलावा डोकावी ते आप्पा घरी आल्यावर. अनेक दिवसांनी घरी आल्यावर मंथम त्यांना बिलगे. त्यांच्या प्रवासाच्या गोष्टी अन् मंथमच्या शाळेतल्या गमतीजमती यामुळं घरातलं वातावरण पारं बदलून जाई. भोंग्याचे कानठळ्या वाजवणारे आवाज काही काळापुरतेच का नव्हे, पण हास्याच्या आवाजात बदलत. भेगाळलेल्या जमिनीवर कुणी पाण्याचा शिडकावा करावा अन् काहीच क्षणांत या पाण्याचं बाष्पीभवन व्हावं, असा हा काळ असे.
इथं वर्गातल्या शांततेनं मंथम भानावर आला. नेहमीच काही न् काही कारण काढून आकांडतांडव करणाऱ्या डेंजर अम्माचा हा नवा अवतार मंथमसाठी नवीनच होता. पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना करण्याच्या आत पुन्हा आवाज कडाडला. “वर्ग आहे की मासळी बाजार म्हणते मी? किती हा गोंधळ? वर्गप्रतिनिधी कुठेय?”
इथं वर्गप्रतिनिधीनं आवंढे गिळायला सुरुवात केलेले. दबक्या आवाजात तो उत्तरला “बाई मी”. “अरे तू स्वत:ला वर्गप्रतिनिधी म्हणतोस अन् वर्गाला शांत करू शकत नाहीस. मुलांकडून पाढे बोलून घे, फळ्यावर नावं लिही”. पुन्हा एकदा गर्जना…
एव्हाना सर्व वर्गाला कळून चुकलेलं ही तर मंथमची अम्मा. मंथमच्या आजूबाजूने कुजबुज सुरू झालेली. “ए मंथम तुझ्या आईला गप्प कर ना रे” वर्गप्रतिनिधीवर मुलांकडून पाढ्यांचा सराव करून घेण्याचे कार्य सोपवून मंथमच्या मातोश्री वर्गातून बाहेर गेल्या. काही वेळाने दुसरे शिक्षक आले अन् त्यांनी पालकसभा सुरू केली. मुलांनी ‘हुश्श’ म्हणत वर्गातून काढता पाय घेतला.
मंथम घरी पोहोचला. आज स्वारीचा नूर काही वेगळाच होता. आज आप्पाही कचेरीतून लवकर पोहोचले होते. अम्मा यायला अजून अवकाश होता. मंथमने दप्तर काढून जागच्या जागी ठेवले. हातपाय धुतले अन् थेट आप्पांच्या खोलीतच शिरला. कधी नव्हे ते मंथम आप्पांसमोर भडाभडा बोलला. सर्व किस्सा सांगितला. इतक्यात डेंजर अम्माही घरी पोहोचली. बापलेकाचं आपल्या मागून काय चाललंय हे पाहण्यासाठी ती लागलीच तिच्या पतीराजांच्या खोलीत शिरली.
पाहते तर काय? बापलेक हसत होते. मंथमला पाहताच तिनं डोळे वटारले. “काय रे मी आज तुझ्या वर्गात आलेले. पण तू कुठे मला दिसला नाहीस?” मंथन हळू आवाजात पण थोडी हिम्मत करून उद्गारलाच, “तू अशी देवी अंबामातेचा अवतार धारण करून समोर उभी ठाकलेलीस, ते पाहून मी बाकाखाली जाऊन लपलेलो”. बस्स! बापलेकाचा एकच हशा पिकला. अम्मा पुन्हा डोळे वटारून दोघांकडे बघू लागली. पण तिच्याकडे लक्ष कोणाचं होतं? ते दोघे तर एकमेकांना टाळ्या देण्यात गर्क होते.