आपल्या महाराष्ट्रातही वेगवेगळ्या ठिकाणी देवीची मंदिरे आढळतात. त्यात प्रामुख्याने तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी ही देवीची साडेतीन पीठे शक्तिस्थान म्हणून ओळखली जातात. असेच एक जागृत स्थान म्हणजेच आपल्या कोकणातील दाभोळची स्वयंभू श्री चंडिकादेवी.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य गाव म्हणजे दाभोळ होय. दालभ्य ऋषींच्या वसतिस्थानाने पावित्र्य झालेले हे गाव. सध्या एन्रॉन प्रकल्पामुळे गाजत असलेले हे दाभोळ बंदर प्राचीन असून त्याचा उल्लेख १५/१६व्या शतकात रशियन वर्णनात सापडतो. एका बाजूला वशिष्ठी नदीमुळे तयार झालेली समुद्रकिनारा आणि इतिहासाची साक्ष देणारा गोपाळगड, बाजूला दाभोळ बंदर, तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या टेकडीवर असलेले स्वयंभू चंडिका देवीचे गुहेतील प्राचीन व जागृत मंदिर.
दापोली शहरापासून साधारण २८ किमी अंतरावर एका टेकडीवर वसले आहे श्री स्वयंभू चंडिका देवीचे स्थान. टेकडीच्या डावीकडील भागातून खाली उतरल्यावर एकसंध दगडामध्ये कोरलेल्या भुयारवजा गुहेमध्ये असलेल्या श्री स्वयंभू चंडिका देवीच्या मंदिराकडे येतो. गुहेमध्ये प्रवेश करताना एका छोट्या दरवाजातून वाकून जावे लागते. आत आल्यावर आपल्याला दिसते ती काळ्याकभिन्न पाषाणाच्या गुहेत कोरलेली नंदादीपाच्या प्रकाशात उजळलेली मंगलमय आणि सोज्वळ शेंदूरचर्चित चंडिका देवीची मूर्ती. अशी ही प्रसन्न मूर्ती पाहताक्षणी आपले भान हरपते. श्री स्वयंभू चंडिका देवीचे रूप जेवढे सुंदर तेवढेच रौद्रही भासते. देवीच्या भुवया मोठ्या असून ती आपल्या नयनांनी संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून असल्याचे सांगतात. देवीला चार हात असून तिच्या उजव्या हातात तलवार आहे. चंडिकेचे मुख नैऋत्य दिशेला असून ती पूर्णपणे शाकाहारी आहे. देवीच्या मूर्तीजवळ एक इतिहासकालीन तलवार आहे.
गुहेत केवळ गोड्यातेलाचे नंदादीपच तेवत असतात. अन्य प्रकाश साधनांची येथे सक्त मनाई आहे. देवीच्या गाभाऱ्यातील जागा अंधारात लहान भासत असली तरी देवीच्या सभोवताली ४०० माणसे उभी राहतील एवढी आहे. म्हणून देवीला प्रदक्षिणा करून मूळ प्रवेशद्वाराशी आपल्याला परत येता येते. देवीचे स्वयंभू स्थान असलेली ही गुहा पांडवकालीन आहे, असे सांगितले जाते. पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी आपल्या दैवी शक्तीने ही गुहा निर्माण केली. या गुहेत अनेक लहान-लहान भुयार आहेत. ही भुयार म्हणजे काशीला जाण्याचा मार्ग, असे म्हटले जात असे आणि स्वयंभू स्थानामागची कथा अशी की, गोसावी महंत ‘जमना पुरी’ यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिला व गुहेचा मार्ग आणि गुहेच्या द्वारावरील शिळा हटवण्यास सांगितले. जमना पुरी यांनी त्यानुसार गुहा शोधली व शिळा हटवली. गुहेत त्यांना देवीची पाषाणी मूर्ती आढळली. या मूर्तीची विशेषत: म्हणजे ही केवळ कंबरेपर्यंत आहे म्हणजे देवीचे अर्धे शरीर जमिनीखाली आहे. जमना पुरी यांनी देवीची पूजा-अर्चा चालू केली. कालांतराने ही पूजा-अर्चा ‘बाळ पुरी’ या विश्वस्तावर सोपवून त्यांनी मंदिराजवळच जिवंत समाधी घेतली. तेव्हापासून देवीच्या पूजेचे हक्क पुरी घराण्याकडे आहेत. सध्या देवीची पूजा-अर्चा करणारी पिढी ही पुरी घराण्याची ३२वी पिढी. या समाजातील माणूस मृत पावल्यानंतर त्याच्या नामे शिव लिंग तयार केले जाते. इथेही मंदिराबाहेरील चौथऱ्यावर तुळशी वृंदावन व बरीचशी शिवलिंगे आहेत.
पावसाळी दिवसांत जवळच एक धबधबा कोसळतो. त्याचे पाणी झरा बनून मंदिराजवळून वाहते. मंदिर मुख्य गावापासून दूर असल्यामुळे येथे ग्रामस्थांची व पर्यटकांची संख्या कमी आहे. अश्विन प्रतिपदा ते विजयादशमी या दिवसांत फक्त ही संख्या वाढलेली दिसते. या देवीला मांसाहार चालत नाही, ती शुद्ध शाकाहारी आहे म्हणून येथे बळी वगैरे देण्याची प्रथा नाही. शिवाय मंदिरातून कोणत्याही स्वरूपात वर्गणी आकारण्यात येत नाही व देणगी गोळा केली जात नाही. मंदिराचे सर्व अधिकार हे वंशपरंपरेने पुरी घराण्याकडे आहेत. त्यामुळे मंदिराची देखभाल वगैरे तेच पाहतात. दाभोळ गावात असलेल्या इंगळाई-भैरीदेवी या श्री चंडिकेच्या बहिणी असून दालभ्येश्वर, नवनाथ दत्त मंदिर आदी देवांना तिने आपल्या छत्रछायेखाली घेतले आहे, असे स्थानिकांचे मत आहे. अशा या जागृत देवीचे दर्शन घेऊन त्या अंधाऱ्या गुहेतून पणत्यांच्या मंद प्रकाशात प्रदक्षिणा पूर्ण करून आपण बाहेर पडतो. बाहेरील रचनेवरून आत असलेल्या गुहेची अजिबातच कल्पना येत नाही.
फार पूर्वी दालभ्य ऋषींनी या गुहेत तपसाधना केल्याचे सांगितले जाते. नवरात्रीत देवीचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. मंदिराच्या मुख्य द्वाराजवळच घटस्थापना केली जाते. पहाटे साडेचार-पाचच्या सुमारास काकड आरतीला सुरुवात होते. दसऱ्याच्या दिवशी सोने लुटून मंदिरावर निशाण चढविले जाते. देवीचे स्वरूप हे स्वयंभू असून ती नवसाला पावणारी जागृत देवी आहे. उत्सवाच्या काळात विविध भागांतून भक्त देवीच्या दर्शनाला हजारोंच्या संख्येने येत असतात. चंडिकेवर जेव्हा मुघलांचे राज्य आले तेव्हा शिवरायांनी येथे स्वारी केल्याची नोंद आहे. तरीसुद्धा आपली एक परंपरा व खास कोकणी ठसा अजूनही या गावात जाणवतो.
दाभोळ बंदर हे सतत नौकांनी गजबजलेले असते. या बंदराच्या पलीकडे असलेल्या अंजनवेल, वेलदूर परिसरापर्यंत लाँचसेवा उपलब्ध आहे. येथील समुद्रकिनाराही सुरूंच्या झाडामुळे अधिकच आकर्षक वाटतो. खास कोकणी निसर्ग सौंदर्याबरोबर स्वयंभू दालभ्येश्वर मंदिर, नवसाला पावणारा सय्यद अमिरूद्दीन बालापीर, अंडा मशीदही आपले वैशिष्ट्ये जपून आहेत. अंडा मशीद ही प्राचीन वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना मानली जाते. हे मंदिर पुरातन असून शिवाजी महाराजांनी दाभोळ जिंकल्यानंतर अंजनवेलचा गोपाळगड, गोवळकोट व आडीवरे भागावर स्वारी केली. या मोहिमेदरम्यान त्यांनी अनेक वेळा या स्थानास भेट दिली होती, असा इतिहास सापडतो. चंडिका देवी मंदिर मनमोहक आणि सुंदर समुद्र किनारे, किनाऱ्यावर हिवाळ्यात येणारे ‘सी गल’ पक्षी, याच दरम्यान मधूनच कधीतरी घडणारे डॉल्फीनचे दर्शन, हर्णे बंदरावरचा मासळी बाजार, सुवर्णदुर्ग, मंडणगड, बाणकोट यांसारखे गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका प्रसिद्ध आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेले दाभोळ हे गाव “दालभ्य” ऋषींच्या वसतिस्थानाने पावित्र्य झालेले असून एक निसर्गरम्य आणि हिरवेगार गाव अशी ओळख आहे. उत्सवाच्या काळात आजूबाजूच्या गावातून भक्त देवीच्या दर्शनाला हजारोंच्या संख्येने येत असतात.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…