- गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी
आज नोकरीत पदवीधारकांपेक्षा कौशल्याधिष्ठित युवकाचा विचार केला जातो. कंपनीचा खर्च वाचतो. उच्च पदवीधर घेण्याऐवजी पदवीधरांना औषध फार्मसी, काही कंपन्या कामाचे प्रशिक्षण देते.
भर दुपारी माझी लॅब्रेटा स्कूटर खार सांताक्रूझमध्ये बंद पडली. ढकलत ढकलत एका मेकॅनिकसमोर थांबवली. “काय झालंय?” त्याचा प्रश्न. संतूर वादक उल्हास बापट म्हणाले, “काही केल्या स्टार्ट होत नाही. पॅनेल उघडून त्यांनी मला किक मारायला सांगितली.” “एक मिनिट थांबा”, असे म्हणत मेकॅनिकने लॅब्रेटाच्या सीटच्या खाली कॉइलची सुटलेली वायर तीन सेकंदात लावली. स्कूटर स्टार्ट झाली. पाच रुपये मागितले. (त्या काळचे) “अहो! नुसती वायर तर लावलीत.” कुत्सितपणे माझ्याकडे पाहून हसला. “वायर लावण्याचे पाच रुपये नाहीत, ते लक्षात येण्याचे आहेत.” हेच व्यवसाय कौशल्याचे सामर्थ्य!
कोणत्याही कार्यक्रमांत, रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्याला कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाची किती वेळा गरज लागते? पालकांनी लहान वयातच आपल्या मुलांना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारे कौशल्याचे शिक्षण द्यावे. मूल नववीत गेल्याबरोबर त्याच्या छंदाचे क्लास बंद होतात. कशासाठी?
अमेरिकेतल्या लेंड-अ-हँड इंडियाच्या आर्थिक सहकार्यात कौशल्य विकासाचा उपक्रम महाराष्ट्रात ३५०च्या वर माध्यमिक शाळांत ९/१०वीसाठी चालू आहे. “पढे चलो, बढे चलो.”
१. अभियांत्रिकीत : सुतारकाम, ऑटोमोबाइल, मेकॅनिक, शेतीची अवजारे; २. ऊर्जा विभागात : इलेक्ट्रिक लॅब उपकरणाची जोडणी/दुरुस्ती; ३. गृह आरोग्यमध्ये : पाक-सौंदर्य शास्त्र, शिवणकाम, रक्त-पाणी-माती तपासणी व आरोग्याची काळजी; ४. खेळ. शाळेतच शिक्षणाला जोड देणारे कौशल्याधिष्ठित व्यावसायिक शिक्षण मिळाल्यास विद्यार्थी दहावीनंतर स्वतःच्या पायावर उभा राहतो. कौशल्याधिष्ठित शिक्षण आता मुख्य प्रवाहातील शिक्षणाचाच एक भाग आहे.
१०/१२ वीनंतरचा शाखा प्रवेशाचा संबंध मुलाच्या आवडी आणि पगाराशी आहे. करिअरच्या दृष्टीने कौशल्य शिक्षण महत्त्वाचे. झेपत नसताना पालकांच्या इच्छेखातर घेतलेला प्रवेश, विषयाची नावड, म्हणून आज ८० टक्के लोक करिअरमध्ये समाधानी नाहीत. आज पदवीधर, डिप्लोमापेक्षा १. ‘आयटीआय’ला मागणी जास्त आहे. २. MCVC : कमीतकमी क्षमता असलेले वोकॅशनल कोर्सेसमध्ये अनेक शाखांचे पर्याय असून, त्याचा अभ्यासक्रम व्यावहारिक ज्ञानावर आधारित, तुलनेने फी कमी आहे. येथे वर्गसंख्य कमी, प्रात्यक्षिकातून शिकताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. विषयाचा अंदाज येतो. बारावीचे प्रमाणपत्र हाती आल्यावर, ‘आयटीआय’प्रमाणे येथेही पुढे शिकून पुन्हा नवीन प्रवाहात सामील होऊ शकता. ३. चित्रकलेच्या दोन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर
जी डी आर्ट्सचे पाच वर्षांचे शिक्षण संपल्यानंतर वृत्तपत्र जाहिरात, डिजिटल, मीडिया, कॅलिग्राफ अनेक दलाने खुली होतात. ४. ओबीई (outcome based education) या परिणामांवर आधारित शिक्षणांत परिणामकारकता मोजण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र शासनाने नुकतेच कौशल्याधिष्ठित विद्यापीठ सुरू केले आहे तसेच मुंबईसह अनेक राज्यांत कौशल्याधिष्ठित विद्यापीठे कार्यरत आहेत.
आज नोकरीत पदवीधारकापेक्षा कौशल्याधिष्ठित युवकाचा विचार केला जातो. कंपनीचा खर्च वाचतो. उच्च पदवीधर घेण्याऐवजी पदवीधरांना औषध फार्मसी, काही कंपन्या कामाचे प्रशिक्षण देते.
जास्त लोकसंख्या असलेला भारत हा तरुणांचा देश आहे. केंद्रीय मंत्रालयातर्फे बऱ्याच राज्यांत कौशल्य विकास कार्यक्रम राबविले जातात. त्यांचा मुख्य उद्देश तरुणांना रोजगारास सक्षम करणे. (टर्नर, फिटर, इलेट्रिशिअन, प्लम्बर, गवंडी) फक्त कौशल्य हस्तगत करण्यावर भर न देता युवकांनी स्वावलंबी व्हावे हे महत्त्वाचे आहे. युवकाचे स्वतःचे गॅरेज, फूड सेंटर, ब्युटी पार्लर, घरपोच सेवा, उपकरण दुरुस्ती अशी केंद्रे असावीत. आज श्रमांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. एमआयडीसी परिसरात, विविध कंपन्यांत, सोसायटीत सर्वत्र प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ ठेवतात.
कौशल्य म्हणजे तुम्ही करू शकता अशा गोष्टी. कौशल्य म्हणजे कलागुण. एखाद्या गोष्टीत हातखंडा असणे. तरबेज असणं. जन्माला आलेल्या प्रत्येकाकडे कोणते तरी कौशल्य असतेच. ‘असे कुठले कौशल्य मला सर्वाधिक मदत करू शकेल? उत्कृष्ट पद्धतीने विकसित केले, तर तुमच्या कारकिर्दीवर सर्वाधिक सकारात्मक परिणाम होईल’ ते शोधा, मग त्यावर लक्ष केंद्रित करा. त्यावर प्रभुत्व मिळेपर्यंत परिश्रम चालू ठेवा.
आवडत्या विषयांत विशेष प्रावीण्य मिळवा. आजचा जमाना स्पेशालिस्टचा आहे. आपल्या मेकअप कलेतून अनेक व्यक्तिरेखा जिवंत करणारे भारतीय मेकअपमन विक्रम गायकवाड यांचे नाव जगात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई. या दोघांच्या कौशल्यामागे खूप मेहनत व अभ्यासही आहे.
गडचिरोली गोडवाना विद्यापीठांत कौशल्य अभियानअंतर्गत, पारंपरिक कोर्स राबविण्यापेक्षा भविष्यातील संधींचा विचार करून हमखास रोजगार देणारे सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिक्युरिटी अॅनालिस्ट व डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर यांचे प्रशिक्षण त्या त्या फिल्डमध्ये काम करणाऱ्या लोकांकडूनच विद्यार्थ्यांना देतात. कारण विद्यापीठच विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा म्हणून गंभीर आहे. आजच्या अर्थव्यवस्थेत पर्यावरण, सेवाउद्योग आणि तंत्रज्ञानात संगणक, मोबाइल ही क्षेत्रे महत्त्वाची आहेत यात तज्ज्ञ व्हा. आजच वाचले भालचंद्र कुलकर्णी यांचे मोबाइल पत्रकार बना.
शिक्षकांनीही कौशल्य शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहिले पाहिजे. तांत्रिक कौशल्य हे एका विशिष्ट कार्यक्षेत्राशी संबंधित असून सहजतेने लगेच पाहून समजते. पदोन्नतीसाठी आवश्यक आहे. दुसरे सॉफ्ट जीवनकौशल्य! हे वैयक्तिक आणि देवाण-घेवाण संबंधीच्या क्षेत्रांत महत्त्वाचे. जीवनकौशल्य सहजपणे दिसत नाही. ते अभिव्यक्तीच्या स्वरूपात, सादरीकरणात असते. येथे टीमवर्क, सहयोग कौशल्य अधिक महत्त्वाचे. इतरांसोबत काम करू शकतील, अशाही लोकांचा विचार केला जातो.
रुळलेल्या वाटेवरून न जाता नव्या वाट चोखा. मी नोकरी देणारा होणार मागणारा नाही, हे मनाशी पक्के हवे. नवनवीन शिकणाऱ्या उमेदवाराची कामावर घेताना दखल घेतली जाते. आजही मधल्या वयात रुळलेली नोकरी सोडून राहुल व संपदा कुलकर्णी शेतात, अन्नपूर्णा जयंती कठाळे पूर्णब्रह्म उपाहारगृहांत व्यस्त आहेत. १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन. २१व्या शतकांत युवकांचे सर्वांत मोठे जर कोणते सामर्थ्य असेल, तर ते आहे कौशल्य! नवी कौशल्य आत्मसात करण्याची क्षमता (रि-स्किल) आणि त्यात नंतर सुधारणा करा (अप स्किल). प्रत्येक लहान-मोठे कौशल्य व्यक्तीला आत्मनिर्भर बनविते. हेच व्यवसाय कौशल्याचे सामर्थ्य!