Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Rain Season Health: नेमेचि येतो हा पावसाळा, आपले आरोग्य सांभाळा...

Rain Season Health: नेमेचि येतो हा पावसाळा, आपले आरोग्य सांभाळा...
  • हेल्थ केअर: डॉ. लीना राजवाडे

अजूनही खरं तर सुरू न झालेला पण प्रायः उन्हाळ्यानंतर नेमेचि येणारा ऋतू म्हणजे पावसाळा. नुकताच ज्याच्या नावाने आपण आषाढ शुद्ध प्रतिपदा साजरी केली, त्या कवी कालिदासाच्या साहित्य निर्मितीचाही प्रेरक असा हा वर्षा ऋतू. मनात असंख्य भावनांनी माणसालाच नव्हे, तर चराचर सृष्टीला भुरळ पाडणारा ऋतू. या काळात काय खावे, प्यावे, आरोग्य कसे सांभाळावे याविषयी भारतीय वैद्यक शास्त्र काय सांगते, हे आजच्या लेखात जाणून घ्यायचा प्रयत्न करू यात.

ऋतूचर्या याविषयी खरं तर विस्ताराने मागील काही लेखांत आपण पाहिले आहे, तरी इथे लक्षात घ्यायचा महत्त्वाचा विषय म्हणजे, निसर्गाकडून सर्व सृष्टीलाच हळूहळू बल किंवा ताकद मिळायला पावसाळा ऋतूपासून सुरुवात होते. आता हळूहळू उन्हाळा संपून हवेतील गरम, कोरडेपणा हळूहळू कमी होईल. थंडावा, आर्द्रता, गारवा वाढायला लागेल. साधारण श्रावण भाद्रपद हे दोन महिने पावसाळा असेल. इंग्रजी वर्षानुसार या वर्षी जुलै १८ ते १८ ऑक्टोबर एवढा कालावधी पावसाळा अनुभवता येणार आहे. तेव्हा या कालावधीत पुढीलपैकी गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास आरोग्य सांभाळता येऊ शकेल, ते पाहूयात.

पावसाळ्याच्या सुरुवातीला विशेषकरून पचनशक्ती सांभाळायला हवी. त्यामुळे एकूणच पुढे शरद हेमंत ऋतूतील थंडीच्या कालावधीत मिळणारी ताकद दीर्घकाळ आरोग्य टिकवण्यास फायदेशीर ठरू शकते.

  • आहारात धान्य-तांदूळ, गहू, ज्वारी (कमीत कमी एक वर्ष जुने वापरावे)
  • डाळी - मूग,मसूर, कुळीथ
  • भाज्या - पडवळ, भेंडी, दोडका
  • फळे - खजूर, खोबरे
  • दूध - गाईचे दूध, दही, तूप, दह्याची निवळ (सौवर्चल मीठ घालून प्यावी)
  • पाणी - एक-दोन वेळा पाऊस पडून गेल्यावर स्थिरावलेल्या पावसाचे पाणी, उकळून गार केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे.
  • घरात कोणत्या औषधी असाव्यात?
  • हळद, आले, सुंठ, मिरे, तुळस.
  • मध्वरिष्ट, जांगलं प्राण्यांचे मांस, विविध प्रकारची यूष किंवा सूप घ्यावीत.
  • विहारात पुढील गोष्टीचा अवलंब करावा -
  • खल ओलेपणा यामुळे अनवाणी पायी बाहेर चालणे टाळावे
  • हवेतील आर्द्रतेला विरुद्ध अशा सुगंधी गोष्टींनी राहते. ठिकाण आणि अंगावर घालायचे कपडेही धूपन करावे.
  • वाहत्या पाण्यात श्रम करून पोहू नये, एकूणच अधिक कष्ट होतील, असे श्रम टाळावेत.
  • दिवसा झोपणेही शक्यतोवर टाळावे.
  • पावसाळ्यात रोगप्रतिकार क्षमता कमी झालेली असल्याने या दिवसांत शरीराच्या अर्धा शक्ती व्यायाम करावा, असे आयुर्वेदात वर्णन आहे.
  • योगासने, चालणे, प्राणायाम यासारखे व्यायाम नित्य नियमित करावेत जेणेकरून शरीराची पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते.
  • पावसाळ्यात उपयोगी पारंपरिक काही पाककृती -
  • ढक्कू - मसूर किंवा मूग डाळ शिजवून घ्यायची. त्यात मीठ, लसूण काळी मिरे तुपात तळून वरून घालायचे. सगळे एकत्र करून परत उकळायला ठेवायचे. त्यात आमसूल किंवा चिंच टाकावी. हे भाकरी, पोळी, भात कशाबरोबरही छान लागते.
  • डबलबीन्सची करी - डबलबीन्स, नारळाचा चव वापरून ही करतात. लसूण, आले, बदाम कांदा बारीक वाटून घ्यावे. मोठा चमचा, तूप पळीत गरम करायचे, त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा, वरील वाटण घालायचे. डबलबीन्स शिजवून घेऊन, घोटून त्यात नारळ दूध, वरील मसाला घालावा. चवीनुसार चिंचेचा कोळ, मीठ घालून, आवश्यकतेनुसार पाणी घालून एक उकळी काढावी.
  • जुनी तृणधान्ये, तांदूळ बरोबर चवीनुसार मांसाहार करताना रेड मीट किंवा मासेऐवजी पोल्ट्री चांगली आहे.
  • मुसळधार पावसाच्या दिवसांमध्ये, अन्न विशेषतः आंबट आणि खारट, पुरेसे तूप आणि मधा सह सहज खाल्ल्यास चांगले पचू शकते.
  • उबदार सुखदायक चहादालचिनी-मिश्रित आणि आले-इन्फ्यूज्ड चहा, हे एक उत्तम पेय आहे.
  • दशमूलारिष्ट, हे औषधी वनस्पतींचे एक शक्तिशाली मिश्रण आहे जे पावसाळ्यात सामान्यतः पोटातील गॅस, फुगणे आणि अपचन या लक्षणांपासून दीर्घकाळ आराम देते.
  • कडधान्यांचे सूप, विशेषत: हरभऱ्याचे, जुन्या वाइनच्या सहवासात, ज्यांची पचनशक्ती चांगली असते त्यांना सल्ला दिला जातो.
  • मांसाहारी लोकांनी गावरान कोंबडीचे सूप दालचिनी, मिरे, सुंठ, सैंधव घालून घ्यावे.
  • उन्हाळा संपून पावसाळा सुरू होताना हळूहळू उन्हाळ्यातील सवयी कमी करत क्रमानेच पावसाळ्यातील सवयी अंगीकाराव्यात. त्यामुळे शरीरालाही ते बदल सवयीचे होऊन आरोग्य टिकायला मदत होऊ शकते.

leena_rajwade@yahoo.com

Comments
Add Comment