
मुंबई (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. तसेच गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या राज्यांचा काही भाग सोडल्यास देशातील बहुतांश भागात मान्सूनने जोरदार मुसंडी मारली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २६ ते २८ जूनपर्यंतचे अंदाज जारी केले असून त्यानुसार २६ जूनला रायगड, रत्नागिरी, पुणे आणि विदर्भात नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोलीला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २७ जून रोजी राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.
हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टनुसार २८ जूनला पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि रायगड, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सातारा, अमरावती, वर्धा आणि नागपूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस होऊ शकतो.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या काही तासात मुंबई, रायगडमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय ठाणे, पुणे, पालघर, अहमदगनर, सोलापूर, सातारा, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाऊस होऊ शकतो. याशिवाय वारे देखील वेगाने वाहू शकतात.