स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर
एकोणीस जून हा शिवसेनेचा स्थापना दिन. यंदा या पक्षाचा ५७वा वर्धापन दिन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा सेनेने आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला. ठाकरे सेनेचा वर्धापन दिन शीव येथील षण्मुखानंद सभागृहात, तर शिवसेनेचा वर्धापन दिन गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये साजरा झाला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला मंत्र्यांची आणि नेत्यांची मांदियाळी व्यासपीठावर होती. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे याचा रुबाब आणि भाषा मातोश्रीला आव्हान देणारी होती. शिवसेना विस्ताराचा त्यांनी ध्यास घेतला आहे, असे त्यांच्या भाषणातून जाणवत होते. मुख्यमंत्री व शिवसेनेचे सर्वोच्च नेते अशा दोन्ही भूमिकांतून ते वावरताना दिसले. उबाठा सेनेच्या वर्धापन दिनाला व्यासपीठावर नेते, उपनेत्यांची रांग होती. पण त्यातले अनेकजण स्वत:च्या भविष्याबाबत चिंतेत असल्याचे दिसत होते. वर्ष उलटले तरी पक्षप्रमुख अजुनही एकनाथ शिंदे व त्यांच्या चमूला गद्दार म्हणून हिणवत आहेत. उबाठाच्या कार्यक्रमात उसने अवसान आणून घोषणा दिल्या जात होत्या, तर शिवसेनेच्या कार्यक्रमात जोश आणि होश बघायला मिळाला. षण्मुखानंदला सत्ता गमावलेल्या लोकांची उपस्थिती होती, तर नेस्को सेंटरला शिवसैनिकांचा दांडगा उत्साह दिसून आला.
गेल्या वर्षी वीस जूनला एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला व सहकारी आमदारांसह सूरतमार्गे गुवाहाटीला कूच केले. शिवसेनेचे चाळीस आणि दहा अपक्ष अशा पन्नास आमदारांच्या ताकदीवर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदालाच थेट आव्हान दिले. आपला पक्ष हीच खरी शिवसेना असा दावा केला. ठाकरे बहुमताच्या परीक्षेला सामोरे न जाताच वर्षावरून मातोश्रीवर परतले. ठाकरे गेले आणि भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले. शिंदे मुख्यमंत्री व फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. निवडणूक आयोगानेही शिंदे यांची भूमिका मान्य करून त्यांच्या पक्षाला शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्हही बहाल केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर कायम राहिले. शिवसेनेच्या सोळा आमदारांवरील करवाई करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. तो अद्याप प्रलंबित आहे. एवढ्या सर्व घडामोडींनंतर एका पक्षाचे दोन वर्धापन दिन साजरे झाले व दोन्ही कार्यक्रमांत एकमेकांवर आसूड ओढले गेले. शिंदे आणि ठाकरे हे एकमेकांचे किती राजकीय कट्टर दुष्मन झाले आहेत, याचेच दर्शन या वर्धापन दिनाला घडले.
ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले, सरकार गेले, शिवसेनेत उभी फूट
पडून मोठे-मोठे दिग्गज नेते त्यांना सोडून गेले. वर्षभरात झालेले नुकसान भरून काढणेही अशक्य होऊन बसले. सरकार गेले, पक्षाचे नाव गेले, चिन्ह गेले आणि रोज कुणी ना कुणी पक्ष सोडून शिंदेंच्या शिवसेनेत जातच आहे. मुख्यमंत्रीपद मिळाले आणि जोडीला पक्षाचे नाव व चिन्ह मिळाले म्हणजे सर्व काही मिळाले असे शिंदे यांना समजता येणार नाही. पक्षबांधणीचे फार मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. शिवसेना ही केवळ मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीपुरती मर्यादित ठेवून चालणार नाही. जे चाळीस आमदार व तेरा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत आलेत, त्यांच्या मतदारसंघांत काय परिस्थिती आहे याचे वास्तव चित्र समजावून घेऊन उपाय योजले पाहिजेत. उबाठा सेनेतील अनेक मोठे नेते शिंदेंबरोबर आले. पण सामान्य शिवसैनिक किती आले आहेत व सामान्य जनतेला काय वाटते, याचे भान पक्ष संघटनेचा विस्तार करताना ठेवले पाहिजे. ‘३६५ दिवस २४ तास, शिवसेना एकच ध्यास’ अशा घोषणा वर्धापन दिनाला सर्वत्र फलकांवर झळकत होत्या. केवळ शिंदे यांच्या पुढे-मागे धावणारे नेते असतील, तर शिवसेना वाढणार नाही, लोकांना उपलब्ध असणारे व लोकांचे प्रश्न ऐकून त्यांची काम करणारे नेते हवे आहेत. तुलनेने शिंदे यांच्याकडे शाखांची संख्या खूपच कमी आहे. शाखांचे जाळे उभारण्यास वेळ लागणार, तोपर्यंत जनसंपर्क कसा ठेवणार? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो शिंदे व ठाकरे या दोघांच्या पक्षाच्या फलकावर दिसतात. शिवसैनिकांचे आजही श्रद्धास्थान शिवसेनाप्रमुख आहेत. शिंदे मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांच्याभोवती प्रसिद्धीचे वलय आहे. पण जनतेकडे मते मागण्यासाठी शिंदे यांना नेत्यांची फळी उभी करावी लागेल. त्यांच्याकडील काही नेते त्यांच्या मतदारसंघापुरते मोठे असतील, पण राज्यपातळीवर प्रचार करणारे व फिरणारे असे कोण आहेत? संघटना बांधणीचे फार मोठे आव्हान शिंदे यांच्यापुढे आहे.
उद्धव ठाकरे हे सत्तेवरून पायउतार झाल्यावर त्यांना पाहण्यासाठी व त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोकांची सुरुवातीला गर्दी होत होती. पण त्यांचा टीकेचा रोख हा एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी यांच्याकडेच होता व आजही आहे. गद्दार आणि खोकी अशी तीच ती टीका, तेच भावनिक आवाहन, वडील चोरायला निघाल्याचा आरोप, मिंधे सरकार म्हणून रोज हिणवणे याला लोकही कंटाळले व दिवसेंदिवस क्रेझ कमी होऊ लागली. एकनाथ शिंदे हे कुशल संघटक आहेत. गर्दी जमविण्यातही ते माहीर आहेत. पण या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये करण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागणार आहेत.
भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे. राज्यातून फडणवीस-बावनकुळे यांची शिंदे यांना साथ आहे. केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आशीर्वाद आहेत. पण शिंदे निवडणुकीच्या राजकारणात आपल्या संख्याबळाची ताकद सिद्ध करू शकले नाहीत, तर शिवसेनेचे महत्त्व कमी होण्याचा धोका आहे. म्हणूनच संख्याबळाची शक्ती कायम ठेवणे व वाढविणे हे मोठे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे.
शिंदे यांच्याबरोबर पन्नास आमदार आहेत, पैकी अनेकजण महत्त्वाकांक्षी आहेत. अनेकजण मंत्रीपदाच्या आशेवर आहेत. जे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहून मिळाले नाही, ते एकनाथ शिंदे देऊ शकतील, असे त्यांना वाटते. नवे सरकार येऊन वर्ष होत आले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. महामंडळावर अध्यक्ष नेमले गेले नाहीत. संघटनेत अनेकांना पदे मिळाली. पण त्यात अनेक हौशे-गवशे व नवशेही आहेत. शिवसेना म्हणून पक्षाचे काम करण्यासाठी किती पुढे आले व आपल्याला काही हवे म्हणून कितीजण आले? याचाही आढावा घेणे गरजचे आहे. शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत व शिवसेनेचेही तेच सर्वेसर्वा आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्ष झाले तरी अपेक्षित संघटना अजून उभी राहिलेली नाही. गर्दी खेचणारी उत्तम वक्त्यांची फळी अजून दिसत नाही. शिवसेनाप्रमुखांचे विचार, आनंद दिघेंचे संस्कार आणि हिंदुत्वाची विचारधारा या मुद्द्यावर शिंदे आपला अजेंडा चालवत आहेत. मध्यंतरी ठाणे, कल्याण व पालघर लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हक्क सांगितला, तेव्हा शिंदे-फडणवीसांना डॅमेज कंट्रोलसाठी मोठी कसरत करावी लागली. निवडणुका जवळ आल्या की अन्यत्रही अशा गोष्टी घडू शकतात, याचे भान ठेऊन काम करावे लागेल. फेव्हिकॉलची भाषा वापरून वेळ मारून नेता येईल. पण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळली पाहिजेत, यासाठी डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागेल.
ठाकरे यांचा पक्ष यापूर्वीही अनेकदा फुटला. नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे, गणेश नाईक असे दिग्गज पक्ष सोडून गेले. पण गेल्या वर्षी पक्षात जो मोठा उठाव झाला, त्याने प्रचंड नुकसान झाले. कार्यकर्ते संभाळणारे, कार्यक्रम- सभा- मेळावे- इव्हेंट योजणारे ६० मोठे नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. ही पोकळी भरून काढणे ठाकरे यांना अजून शक्य झालेले नाही. उबाठा सेनेकडे आज विधानसभेतील १६ आमदार व लोकसभेतील ५ खासदार उरले आहेत. यापुढे काँग्रेस व राष्ट्रवादीशी समझोता करून ठाकरेंना आणि भाजपचा हात धरून शिंदेंना पुढील वाटचाल करावी लागणार आहे.